नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवळाली कॅम्प येथील एका शाळेत, पहिल्यांदाच वर्गातील विद्यार्थी पाहिले. पहिलीला विद्यार्थी असताना तो तिसरीच्या वर्गात वारंवार बसत होता. त्यामुळे या विद्यार्थ्याला 'स्पेशल चाइल्ड' घोषित करून शालेय व्यवस्थापनाने पालकांना विद्यार्थ्याला शाळेत न पाठविण्यास सांगितले. त्यामुळे पालकांनी नाशिक जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे धाव घेतली. त्यानुसार या मंचाने 'असे अशोभनीय कृत्य कोणत्याही शाळेला करता येणार नाही' असे सांगत त्या विद्यार्थ्याला पूर्ववत शाळेत बसविण्याचे आदेश शालेय प्रशासनाला दिले आहेत.
देवळाली कॅम्प येथील एका शाळेत विद्यार्थी पहिलीच्या वर्गात शिकत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षे घरीच असल्याने व त्याला अचानक शाळेत पाठविल्यानंतर त्याच्यातील शाळेबद्दलचे कुतूहल वाढले. वर्गात गेल्यानंतर तो शांत बसला नाही. पहिली ते तिसरीचे वर्ग तो फिरुन आला. त्याला कुतूहल वाटत होते. मात्र, त्याचे कुतूहल शिक्षकांना वेगळे वाटले. त्यांंनी विद्यार्थ्याच्या पालकांना बोलवत तुमचा पाल्य 'स्पेशल चाइल्ड' असल्यासारखा वागतो, असे सांगून, त्याचे वर्गात लक्ष नसते, त्याला मार्गदर्शन करण्याची आमची क्षमता नाही. त्याला शाळेत पाठवू नका, असे बजावले होते. त्यामुळे पालक मानसिकदृष्ट्या खचले. मुलाच्या पालकांनी शालेय व्यवस्थापनाकडे आर्जव करीत मुलगा कुतूहलापोटी वर्ग फिरतो, त्याने प्रथमच शाळा पाहिली आहे असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिक्षकांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही.
त्यामुळे पालकांनी ग्राहक न्याय मंचात दावा दाखल केला होता. पालकांतर्फे अॅड. उमेश वालझाडे व योगेश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. न्याय मंंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य सचिन शिंपी, प्रेरणा कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी शाळेेला मनाई हुकूम देऊन 17 मे रोजी याबाबत अंतिम सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.