सातारा : बिअर शॉपी लायन्ससाठी लाचेची मागणी; एक्साईजच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तर दोघांना अटक | पुढारी

सातारा : बिअर शॉपी लायन्ससाठी लाचेची मागणी; एक्साईजच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तर दोघांना अटक

सातारा : पुढारी वृत्तसेवा

बिअर शॉपीच्या परवान्याचे (लायन्स) प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) तीन पोलिसांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. दरम्यान, एसीबीने सर्व संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.

सतीश विठ्ठलराव काळभोर (वय 56 मूळ रा. खंडाळा जि.सातारा सध्या रा. प्रसाद अपार्टमेंट, वडगाव बु. जि.पुणे), दत्तात्रय विठोबा माकर (वय 56 मूळ रा. मु. पो. लोहगाव जि. पुणे सध्या रा. कोडोली, सातारा) व नितीन नामदेव इंदलकर (वय 36, रा. कळंबे ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. यातील दत्तात्रय माकर व नितीन इंदलकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यातील सतीश काळभोर हे क्लास 2 तर माकर व इंदलकर क्लास 3 वर्गातील अधिकारी आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार पुरुष 47 वर्षीय आहेत. तक्रारदार यांना बियर शॉपीचे लायसन काढायचे होते. या कामासाठी ते वेळोवेळी संशयित तिघांना भेटले. संबंधित प्रकरण वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवतो, त्यासाठी 3 लाख रुपये द्या, अशी लाचेची मागणी केली. पैशांची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा एसीबी कार्यालयात जावून तक्रार दिली. एसीबी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रार दाखल करुन तपासाच्या सूचना दिल्या. तपासामध्ये संशयितांपैकी दोघांनी थेट लाचेची मागणी केली तर एकाने लाच रक्कम मागणीस प्रवृत्त केले. मार्च महिन्यात लाचेची मागणी निश्चित झाल्यानंतर एसीबी विभाग पुढील कारवाईसाठी थांबला होता. मात्र लाच रक्कम स्वीकारली नाही. यामुळे अखेर सातारा एसीबीने सातारा शहर पोलिस ठाण्यात लाच मागणीबाबतची तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच दोघांना अटक करण्यात आली. मात्र एकाला वैद्यकीय कारणास्तव अटक केली नाही. अटक केलेल्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मार्च महिन्यात 3 वेळा डिमांड…

लाचप्रकरणी तक्रार अर्ज मार्च माहिन्यात दाखल झाला आहे. एसीबीने तपासाला सुरुवात केल्यानंतर दि. 14 व 15 मार्च रोजी संशयितांनी 3 लाख रुपयांची मागणी केली आहे. यानंतर दि. 17 मार्च रोजीही लाचेची मागणी झाली असून लाच देण्यासाठी प्रवृत्त केल्याचे तपासात समोर आले. एसीबीच्या कारवाई प्रक्रियेनुसार ठोस पुरावा मिळाला व त्याआधारेच लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button