नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे इतके सोपे आहे का, असा प्रश्न करत राजकीय वातावरण खराब करण्याचा एकमेव उद्योग सध्या विरोधकांकडून सुरू असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगत भाजपवर निशाणा साधला. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर किरीट सोमय्या दिल्लीला जाऊ शकले असते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ना. भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत भाजपनेत्यांसह राणा दाम्पत्यावर टीका केली. सोमय्या यांना पोलिस स्टेशनमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केलेला असतानाही ते गेले. दगडफेकीनंतर त्यांचे रक्त खाली पडत नव्हते आणि सोमय्या रक्त पुसतही नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी स्थिती अजिबात नाही. परंतु, राज्यातील वातावरण खराब करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एकमुखी मागणी भाजपकडून केली जात असल्यावर त्यांनी बोट ठेवले. दिल्लीत गोळीबार झाला तेव्हा काय झाले, असा प्रश्न करत त्या घटनेचीही त्यांनी भाजपला आठवण करून दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या घरातच मुस्लिमांना नमाजपठण करायला जागा उपलब्ध करून दिल्याची आठवण भुजबळांनी करून देत शिवसेनेला टार्गेट करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंगेशकर पुरस्कार वितरणासाठी बोलविणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना मुख्यमंर्त्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलविणे महत्त्वाचे वाटल्याचे ना. भुजबळ म्हणाले.
मागासवर्गीय असल्यामुळेच पोलिस आपल्यावर अन्याय करत असल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला. यावर बोलताना भुजबळ यांनी राणा यांना टोला लगावला. सरकार आणि पोलिस खात्यातही अनेक जण मागासवर्गीय आहेत. कायदा सर्वांना सारखाच आहे. कारवाई झाली की मागासवर्गीय म्हणत आधार घ्यायचा, असे सांगत मुळात नवनीत राणा या मागासवर्गीय आहेत का, याबाबत ना. भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू असल्याची आठवण करून दिली.
पामतेलाबाबत सारवासारव
इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर बंदी आणल्याने तेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याबाबत ना. भुजबळ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यावर मी याकडे चांगल्या दृष्टीने बघतो, सगळीकडे भाववाढ होतेय, पेट्रोल-डिझेल दरवाढ झाली, तशी पामतेलाचीही दरवाढ होईल, असे सांगत भुजबळ यांनी या प्रश्नाला बगल दिली. परंतु, आपण त्या खात्याचे मंत्री आहात याची आठवण करून देताच त्यांनी यामुळे महागाई वाढेल, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.