मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव तालुक्यातील झोडगे गावात दोन महिन्यांपासून एका मटका-जुगार अड्ड्याने चांगलाच जम बसवत अनेकांची आर्थिक पिळवणूक केली. याबाबत ग्रामीण दौर्यावर असताना राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांना माहिती मिळाली असता, त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकार्यांशी चर्चा करित विशेष पोलिस पथकासह 'त्या' ठिकाणी छापेमारी करित अड्डा उद्ध्वस्त केला.
सोमवारी (दि. 25) दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही धडक कारवाई झाली. याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु असून, त्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल, असे सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृषिमंत्री भुसे हे सोमवारी झोडगे परिसरात कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेव्हा त्यांना झोडगे-अस्ताणे रस्त्यावरील मटका जुगार अड्ड्याबद्दल माहिती मिळाली. साधारण दोन महिन्यांपूर्वी हा क्लब सुरु झाला होता. अल्पावधीत जास्त पैसे कमविण्याच्या आमिषाने अनेक युवक या गैरमार्गाला लागलेत. परिणामी, कौटुंबिक कलहही वाढलेत. या अवैध धंद्याने संसार उद्ध्वस्त होत असताना पोलिस अनभिज्ञ कसे असा सवाल उपस्थित झाला.
कृषिमंत्र्यांनी याप्रश्नी वेळ न दवडता अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना सूचना दिली. ते विशेष पथकासह झोडगेत दाखल झाले. क्लबमधील कारभार उघड झाल्याने त्याचा शेड उद्ध्वस्त करण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु असून, चौधरी नामक व्यक्तीचा हा क्लब असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेचालकच नव्हे तर पोलिस विभागातही खळबळ उडाली आहे.