मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील सिग्नलवर अनेक मुले भीक मागताना किंवा पेन तसेच इतर साहित्य विकताना आढळतात. पायात चप्पलही नसलेल्या या मुलांची वये पाहीली तर त्यांचे भवितव्य काय असा प्रश्न अनेक सुजाण नागरिकांच्या मनात येतो. असाच प्रश्न विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या मनात आला आणि त्यांनी ओव्हल मैदानाजवळच्या सिग्नलवर फुले तसेच विविध प्रकारचे साहित्य विकणार्या 10 मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवला. त्यामुळे त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊ शकणार आहे.
मुंबईतील रस्त्यांवर राहणार्या 10 मुलांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे. मुलांच्या दोन वेळच्या जेवणाबरोबरच त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाल्याने त्यांच्या पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे हे मंत्रालयामध्ये 24 मार्च रोजी बैठकीला जात असताना त्यांची गाडी ओव्हल मैदानाजवळील सिग्नलवर थांबली. त्यावेळी रस्त्यावर फुले विकत असलेल्या एका मुलाने त्यांच्या गाडीमध्ये असलेल्या विठ्ठलाच्या मुर्तीला पाहून फुले विकत घेण्याची विनंती मुलांनी केली. त्या मुलाकडे पाहून संगवे यांनी त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला लावून त्याची माहिती घेतली. तेव्हा तो शाळेत जात नसलयाचे कळले.
याच काळात शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमही मुंबईत सुरु होती. त्या अनुषंगाने त्याच्याबरोबर असलेल्या सर्व मुलांना एकत्र जमा करून त्यांचीही माहिती घेतली असता ही मुले सोलापूर जिल्ह्यातून तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमधून आल्याचे त्यांच्या लक्षात आले. रस्त्यावर राहणारी ही मुले वाईट मार्गाला लागू नयेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी संगवे यांनी मुलांच्या पालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जेवणाची अडचण असल्याने मुलांना शाळेत पाठवणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
राहण्याची आणि जेवणाची केली व्यवस्था
संगवे यांनी शाळाबाह्य मोहीमेअंतर्गत काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना ओव्हल मैदानाजवळ बोलवून त्या मुलांची नोंदणी केली. यामध्ये तीन ते 12 वयोगटातील 10 मुले व मुली आहेत. त्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण विभाग व महिला बाल विकास समितीच्या साहाय्याने सायनमधील मानव सेवा संघ आणि महालक्ष्मी येथील वात्सल्य फाऊंडेशनच्या वसतिगृहामध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे.
वसतिगृहात दाखल केलेल्या या मुलांना त्यांच्या वयोमानानुसार वर्गात प्रवेश दिले जातील. या मुलांना 'शाळा पूर्व तयारी अभियानात' सहभागी केले होते. जूनमध्ये त्यांना शाळेत प्रवेश देण्यात येईल असे असे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी सांगितले.