धुळे : भारनियमनाविरोधात भाजपचे कंदील आंदोलन | पुढारी

धुळे : भारनियमनाविरोधात भाजपचे कंदील आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आघाडी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे भारनियमनाचे संकट उभे राहिले आहे. असा  आरोप करीत धुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने कंदील आंदोलन छेडले आहे.
भारनियमनाच्या विषयावरून भाजप रस्त्यावर उतरली असून या अंतर्गत धुळे शहर व धुळे तालुक्यातील फागणे येथे कंदील आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात खा. डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप महानगर प्रमुख अनुप अग्रवाल, चंद्रकांत गुजराथी, नगरसेवक अमोल मासुले, युवराज पाटील, हर्ष रेलन आदी उपस्थित होते. फागणे येथे कंदील पेटवून प्रतिकात्मक आंदोलन छेडत  महाआघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला ऐन उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासामुळे जनता हैराण झाली आहे. कृषीपंप बिलाची देखील शेतकरी बांधवांकडून पठाणी वसूली करण्यात आल्याने महाआघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात जिल्हा परिषदेच्या सभापती धरती देवरे, माजी सभापती  प्रा. अरविंद जाधव, किशोर सिंघवी, भाऊसाहेब देसले, श्याम बडगुजर, गोकुळ सिंगवी, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील आणि फागणे गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या अंतर्गत धुळे जिल्हा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या योजनेची तातडीने अंमलबजावणी झालेली पहावयास मिळत आहे. एकीकडे वाढते तापमान लक्षात घेता अचानक अघोषित भारनियमन लादल्याने जनता होरपळून निघत आहे. वाढत्या भारनियमनामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवण्याची संभाव्य चिन्हे आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठला असून शेती सिंचनाबरोबरच गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यात अघोषित भारनियमनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भारनियमनामुळे रूग्णालय, शाळा, महाविद्यालय,  प्रशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाच्या अघोषित भारनियमनाचा फटका सर्वांनाच बसत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास त्यास सर्वस्वी शासन व महावितरण जबाबदार राहील, असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button