नाशिक : तुम्हीही जॉगिंगला जाताना मोबाईल सोबत घेऊन जातात? मग सावधान ! | पुढारी

नाशिक : तुम्हीही जॉगिंगला जाताना मोबाईल सोबत घेऊन जातात? मग सावधान !

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास जॉगिंगला म्हणा किंवा सहज आपलं फेरफटका मारायला जाण्याचे प्रमाण हल्ली वाढलंय. अशावेळी मोबाइल हातात ठेऊन वॉकिंग करण्याची अनेकांना सवय आहे. मात्र तुमच्या याच सवयीमुळे तुम्हाला तुमचा मोबाईल गमवावा लागू शकतो.

होय, तुमचा मोबाईल चोरी जाऊ शकतो. असाच प्रकार पंचवटीतील एका जॉगिंग ट्रॅकवर घडला असून, दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने वॉकर्सचा मोबाइल हिसकावून पोबारा केला. त्यामुळे नागरिकांनी जॉगिंग करताना मोबाइल आणि महिलांनी दागिने सांभाळण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमृतधाम परिसरातील महावितरण कार्यालयासमोरील जॉगिंग ट्रॅकवर शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ६.३० च्या सुमारास प्रज्वल सुनील पाटील (१९, गंगोत्री विहार, अमृतधाम, पंचवटी) हे वॉकिंग करत असताना पाठीमागून एका निळ्या रंगाच्या एफझेड या दुचाकीवर एक अज्ञात व्यक्ती आला व त्याने पाटील यांच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून पळ काढला.  प्रज्वल पाटील यांच्या फिर्यादीवरून आडगांव पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख व सहायक पोलीस निरीक्षक तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरवडे हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button