रत्नागिरी : लोटेतील कामगारांचे बळी थांबणार तरी कधी? | पुढारी

रत्नागिरी : लोटेतील कामगारांचे बळी थांबणार तरी कधी?

खेड (रत्नागिरी) : अनुज जोशी
लोटे औद्योगिक वसाहतीत अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. मात्र, येथे कामगारांची औद्योगिक सुरक्षा विचारात घेतली जात नसल्याचे विविध घटनांतून दिसून येत आहे. औद्योगिक विभागाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियमावलीनुसार जर इथल्या कंपन्या उत्पादन प्रक्रिया राबवत असतील तर अपघात नक्की कमी होतील. मात्र केवळ अधिकार्‍यांसोबत अभद्र युती करून व दुर्घटना घडल्यावर राजकारणी व संबंधित यंत्रणांशी सेटलमेंट करून विषय मिटवले जातात. परंतु यात बळी मात्र कामगारांचे जातात. ते थांबवणे आवश्यक आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीत सन 2010 मध्ये व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनी सुरू असताना स्फोट झाला त्यानंतर लहान-मोठे अपघात होतच होते. दि. 11 जानेवारी 2020 रोजी व्ही. व्ही. सी. फार्मा कंपनीला आग लागली, त्यामध्ये कंपनीच्या व्यवस्थापकाचा बळी गेला. दि. 7 मार्च 2020 रोजी नंदादीप केमिकल कंपनीत स्फोट झाला. दि. 20 सप्टेंबर 2020 रोजी एक्सल इंडस्ट्रीजमध्ये स्फोट झाला. जानेवारी 2021 मध्ये दुर्गा फाईन कंपनीत स्फोट, जानेवारी 2021 ला लासा सुपरजेनेरिक (जुनी उर्ध्व) केमिकलच्या घन कचर्‍याला आग, सन 2021 श्रेयस इंटरमिडीएटसच्या (आताची केसर) गोडावूनला आग लागली. दि. 15 मार्च 2021 रोजी सुप्रिया लाईफसायन्स कंपनीत आग लागून दोन कामगार भाजले.

दि. 20 मार्च 2021 रोजी घरडा केमिकल कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू झाला. दि. 18एप्रिल 2021 रोजी समर्थ इंजिनिअरिंग कंपनीत स्फोट व आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाला. याच महिन्यात एमआर फार्मा कंपनीत आग लागली. त्यानंतर बरोबर एक वर्षाने दि. 18 एप्रिल 2022 रोजी प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत अग्नीतांडव घडले आहे. लोटे औद्योगिक वसाहतीत अनेक लहान-मोठे कारखाने असून त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेत वापरण्यासाठी आणण्यात आलेले ज्वालाग्राही रसायन हलगर्जीपणे साठा करून ठेवलेले पहायला मिळतात. औद्योगिक वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यावरून ये-जा करताना तात्पुरती उभारण्यात आलेली साठा गोदाम अनेक ठिकाणी पहायला मिळतात. मात्र याकडे संबंधित यंत्रणेचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहेत. काही लहान कारखानदार पैसे वाचवण्यासाठी सुरक्षा उपकरण कामगारांना देत नाहीत. अनेक कंपन्यांकडे स्वतःचे आपत्कालीन सुरक्षा साहित्य व सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नाही. काही कारखान्यातून अग्निशमन यंत्रणा उभारण्यात आली असली तरी ती कार्यान्वित आहे का नाही? हे तपासण्याची गरज आहे.

जंगलातल्या भारावून टाकणाऱ्या अचाट गोष्टी : अभिनेता हृदयनाथ जाधवसोबत | Ratris Khel Chale Fame Actor

Back to top button