नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे यंत्रणा सतर्क | पुढारी

नाशिक : कोरोना प्रादुर्भावामुळे यंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने केंद्राने राज्य सरकारला हाय अलर्ट दिला आहे. त्यानंतर नाशिक महापालिका व आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.

कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा धोका असल्याने उर्वरित नागरिकांचे लसीकरण करण्यासह नव्याने चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश वैद्यकीय विभागाने महापालिकेच्या रुग्णांलयासह शहरी आरोग्य केंद्रांना दिले आहेत. त्यानुसार दररोज पाचशे ते हजार संशयितांची चाचणी होणार आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनामुळे लाखो लोक बाधित झाले, तर आठ हजार 899 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जणांना म्युकरमायकोसिसचाही सामना करावा लागला आहे. दरम्यान, लसीकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट सौम्य ठरली होती. यात बाधितांसह मृत्यूदर घटला होता. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कोरोनासंदर्भातील सर्व निर्बंध हटवले होते. त्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत झाले आहे. मात्र, चीनसह युरोपियन देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीतही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट केले आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यानुसार संशयितांच्या चाचण्यांचा वेग वाढवण्यासोबतच लसीकरण वाढवण्यावर जोर दिला जात आहे. तसेच बूस्टर डोस लशीचाही वेग वाढणार असल्याचे माहिती अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

जिल्ह्यात नव्याने एकही बाधित नाही : जिल्ह्यात शनिवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. मात्र, आधीचे दोन दिवस प्रत्येकी चार कोरोनाबाधित आढळून आले होते. जिल्ह्यातील सक्रिय बाधित संख्या 13 झाली असून, 52 संशयितांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. तीन बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा :

Back to top button