नाशिक : 45 हजार पोलिसांना तपासाचे प्रशिक्षण; गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाची कामगिरी | पुढारी

नाशिक : 45 हजार पोलिसांना तपासाचे प्रशिक्षण; गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाची कामगिरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलातील पोलिस अंमलदारांना गुन्हे तपासाचे पायाभूत प्रशिक्षण देऊन गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय पोलिसांना प्रशिक्षण देते. त्यानुसार मे 1981 ते 2020 पर्यंत 380 प्रशिक्षण सत्रांमध्ये 45 हजार पोलिस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 2016 ते 2020 दरम्यान गुन्हे तपासाचे विशेष प्रशिक्षण या विषयाच्या 293 सत्रांमार्फत सुमारे 25 हजार पोलिस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. रविवारी (दि.24) शरणपूर रोडवरील नव्या जागेत या विद्यालयाचे स्थलांतर होणार आहे.

गुन्ह्यांचा तपास कसा करावा, त्यातून आरोपींविरोधात गुन्हा शाबित कसा करावा याचे प्रशिक्षण महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या आवारात असलेल्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात दिले जात असते. 1 मे 1981 रोजी या विद्यालयाची स्थापना झाली असून, त्यावर संस्थाप्रमुख म्हणून पोलिस अधीक्षक-उपआयुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त राहतात. या विद्यालयात 2016 पासून एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट, आर्थिक गुन्हे, सायबर गुन्ह्यांसह एकूण 12 गुन्ह्यांच्या तपासाचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.

अशी असेल नवीन इमारत : विद्यालयाकरिता महाराष्ट्र पोलिस गृहनिर्माण मंडळाने निधी दिला असून, तीनमजली इमारतीत आठ प्रशिक्षण वर्ग, सीसीटीएनएस प्रयोगशाळा, न्यायवैद्यक, अंगुलीमुद्रा प्रयोगशाळा स्टुडिओ वाचनालय, सभागृह प्राचार्य, उपप्राचार्य, पोलिस निरीक्षक मंत्रालयीन कर्मचारी यांचे कक्ष आहे. तर आठमजली इमारतीत 114 खोल्यांमध्ये प्रशिक्षणार्थींची निवासव्यवस्था असेल. तर भोजनालय इमारतीत एका वेळी 200 प्रशिक्षणार्थींच्या भोजनाची व्यवस्था राहणार आहे. येथे सौरऊर्जेद्वारे गरम पाण्याची व्यवस्था राहील.

ऑनलाइन प्रशिक्षण : कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यालयात ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. त्यात अंमलदारांच्या दैनंदिन कामकाजाशी निगडित पाच विषयांवर प्रशिक्षण दिले जात होते. यात आत्तापर्यंत 93 सत्रांमध्ये सुमारे सहा हजार 500 अंमलदारांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button