नाशिक : महिलांवरील अत्याचारांत वाढ, महिला आयोगाच्या दीपिका चव्हाण यांची नाराजी | पुढारी

नाशिक : महिलांवरील अत्याचारांत वाढ, महिला आयोगाच्या दीपिका चव्हाण यांची नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांबाबतच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दीड महिन्यात लैंगिक छळ, बलात्कार, वैवाहिक समस्या अशा विविध प्रकारच्या सुमारे 35 प्रकरणांतील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येबाबत राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. 22) राज्य महिला आयोगातर्फे जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. त्याप्रसंगी चव्हाण बोलत होत्या. यावेळी आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस अधीक्षक सचिन पाटील, माधुरी कांगणे, जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, प्रकल्पाधिकारी अजय पडोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये महिला अत्याचारांसंदर्भातील घटनांमध्ये वाढ होत असतानाच, अशा घटनांमध्ये पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस सकारात्मक भूमिकेत असल्याचे चव्हाण म्हणाल्या. पण गुन्ह्यांची संख्या कमी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बैठकीत महिला बालकल्याण विकासअंतर्गत वन स्टॉप सेंटरची माहिती जाणून घेतानाच समितीच्या कार्यालयांना भेट दिली.

पीडित व अत्याचारित महिलेसाठी असलेल्या समुपदेशन केंद्राला चव्हाण व रूपवते यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. याशिवाय आयोगाच्या सदस्यांनी आडगाव येथील ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाची पाहणी केली. या पाहणीत तेथील भरोसा सेल, महिला सुरक्षा समितीची माहिती जाणून घेताना महिला पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची आस्थेने चौकशी केली.

महिला कैद्यांशी संवाद
राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. या भेटीत चव्हाण व रूपवते यांनी तेथील महिला कैद्यांशी संवाद साधला. कैद्यांना येत असलेल्या समस्यांबद्दल कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी चर्चा केली. कारागृहातील महिला कैद्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशा सूचना चव्हाण यांनी कारागृह प्रशासनाला केल्या.

हेही वाचा :

Back to top button