नाशिक : विजेच्या लपंडावाने ‘पाण्या’चा खोळंबा | पुढारी

नाशिक : विजेच्या लपंडावाने ‘पाण्या’चा खोळंबा

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा : लासलगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यास आता महावितरण कंपनीचा अडथळा येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी दिली आहे.

33 केव्हीए लाइन ट्रीप झाल्याने पाइप लिकेज मोठ्या प्रमाणात होतात. तसेच ही पाइपलाइन अनेक शेतकर्‍यांच्या बागेतून गेली असल्याने पाइप फुटल्यास संपूर्ण शेतात पाणी साचत असल्याने शेतकर्‍यांचा रोष वाढत आहे. त्यामुळे धरण उशाशी, कोरड घशाशी, अशी अवस्था सध्या लासलगाव सह 16 गाव पाणीपुरवठा योजनेची झाल्याने वीज वितरण कंपनीकडून वीजपुरवठा खंडित होत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणात मुबलक पाणी असूनही या योजनेच्या लाभार्थी गावांना अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कडक उन्हाळा त्यात 40 अंश तापमान आणि अनियमित पाणीपुरवठा यामुळे ग्रामपालिका प्रशासनासह नागरिकही हैराण झाले आहेत. लासलगावला पाणीपुरवठा करणार्‍या नांदूरमध्यमेश्वर येथे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून एक्स्प्रेस फीडर बसवले असून, तरीदेखील दिवसातून अनेक वेळा सदर लाइन ट्रिप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पण वीज वितरण अधिकारी वारंवार वीजपुरवठा खंडित करतात त्यामुळे संपूर्ण योजनेचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी दिली.

“एक्स्प्रेस फीडर बसवले असून, तरीदेखील लाइन ट्रिप होत असल्याने लासलगावला पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. वीज वितरण कंपनीला फटका पाणीपुरवठ्यामुळे बसत आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी गावांना गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.” – शरद पाटील, ग्रामविकास अधिकारी, लासलगाव.

33 केव्हीएचे अंतर जास्त असल्याने लाइन ट्रिप होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच ती वेळेस आणि किती कालावधीकरिता वीजपुरवठा बंद झाला आहे त्याची नोंद आहे.  – पी. एन. पाटील, सहायक अभियंता, नांदूरमध्यमेश्वर

हेही वाचा :

Back to top button