नाशिक : 18 गुंठे ज्वारीच्या पिकात पक्ष्यांचा मुक्त संचार; दुष्काळात दिलासा

ज्वारी
ज्वारी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : येथील सिन्नर-शिर्डी महामार्गावर खळवाडी परिसरातील एका शेतकर्‍याने पाखरांना खाण्यासाठी सुमारे 18 गुंठे ज्वारीचे पीक उपलब्ध करून एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. ज्ञानदेव विठ्ठल नवले असे शेतकरी कुटुंबातील शिक्षकाचे नाव आहे.

नवले लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या शेतात सुमारे 18 गुंठे ज्वारीचे पीक जोमात आले आहे. एप्रिल महिन्यात तीव्र उन्हाने नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या जीवाची काहिली झाली. अन्नपाण्यासाठी पशुपक्षी दूर जाऊ शकत नाही. यासाठी नवले यांनी शेतात येणारी पाखरे कुटुंबातील सदस्य समजून त्यांच्या अन्न-पाण्यासाठी 18 गुंठ्यांतील ज्वारीचे उभे पीक पाखरांसाठी राखले आहे. त्यामुळे हजारो पाखरांची दाणापाण्याची सोय झाली आहे. काही दिवसांपूर्वी शेजारील शेतकरी किसन पवार यांचे ज्वारीचे पीक पाण्यावाचून वाळून चाललेले असताना ज्ञानदेव नवले यांनी त्यांना पाणी दिले. पाणी दिल्यानंतर वाळून चाललेले पीक हे डौलाने उभे राहिले. तसेच शेजारी पाण्याची मोटर सुरू असल्याने शेतात रोज अन्न-पाण्यासाठी हजारो चिमण्या, साळुंक्या असे अनेक पाखरे यायला लागले. त्यांच्या अन्नाची सोय उपलब्ध झाल्याने ती जोमाने इकडे तिकडे बागडत असून, मुक्तविहार करत आहेत.

पक्ष्यांची उपासमार टळली…
उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी विहिरींनी तळ गाठलेला आहे. पशुपक्ष्यांना दाणापाणी मिळाले नाही तर त्यांची उपासमार होईल. ती टाळण्यासाठी ज्ञानदेव नवले यांनी दुसर्‍याच्या शेतातील सुमारे सात हजार रुपयांचे पीक विकत घेऊन ज्वारीचे कणीस पशुपक्ष्यांसाठी खुले केले. गत दोन वर्षांपूर्वीही त्यांनी असेच ज्वारीचे पीक पशुपक्ष्यांसाठी खुले केले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news