गोवा : पोलिसांनी झाकल्या कॅसिनोच्या जाहिराती | पुढारी

गोवा : पोलिसांनी झाकल्या कॅसिनोच्या जाहिराती

पणजी : पुढारी वृत्तसेवा: शिक्षण संस्थांच्या परिसरात बॅरिकेडस् उभारताना त्यावर कॅसिनोच्या जाहिराती लावल्यामुळे वादात सापडलेल्या वाहतूक पोलिसांनी बॅरिकेडस्वर गोवा पोलिस लिहिलेला सफेद कपडा टाकून कॅसिनोच्या जाहिराती झाकल्या आहेत.

गोवा पोलिसांचे वाहतूक खाते रस्त्यावर दुभाजक म्हणून उभे करण्यासाठी किंवा रस्ता अडवण्यासाठी बॅरिकेडसचा वापर करतात. हे बॅरिकेडस् सरकारच्या पैशातून न उभे करता विविध कॅसिनोकडून पुरस्कृतरीत्या घेतले जातात. ज्यावर कसिनोच्या जाहिराती असतात. कॅसिनोच्या जाहिराती असलेले बॅरिकेडस् पणजीत अनेक ठिकाणी दिसतात. मात्र, पोलिसांनी ते चक्क शिक्षण संकुलाच्या समोर उभे केल्यामुळे शाळांसमोर कॅसिनोच्या जाहिराती करून सरकार काय साध्य करू इच्छिते अशी टीका सुरू झाली.

मिरामार येथील शारदा मंदिर हायस्कूलसमोर तसेच कुजीरा बांबोळी येथील शिक्षण संकुलासमोर कॅसिनोच्या जाहिराती असलेेले बॅरिकेट लावल्यामुळे पालकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. शेवटी पोलिसांनी या बॅरिकेडस्वर सफेद कपडा टाकून त्यावर गोवा पोलिस असे लिहिले व कॅसिनोच्या जाहिराती बाहेरून लपवल्या. मात्र, शिक्षण संकुलासमोर कॅसिनोच्या जाहिराती असलेले बॅरिकेडस् लावू नयेत, येवढे साधे सौजन्य पोलिसांना कसे नाही, अशी टीका सध्या होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button