नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या उन्हामुळे नाशिककरांची तहान भागविण्यासाठी नाशिक महापालिकेला दररोज वाढीव पाणी उचलून त्याचा पुरवठा करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल 90 कोटी लिटर पाण्याचा अतिरिक्त वापर झाला असून, पाणी मागणीत वाढ झाल्याने गंगापूर व मुकणे धरणांतून दररोज 10 दशलक्ष लिटर वाढीव पाणी उचलावे लागत आहे.
यंदा नाशिककरांना पिण्यासाठी गंगापूर धरण समूहातून 4000 दशलक्ष घनफूट, मुकणेतून 1500 दशलक्ष घनफूट, तर दारणा धरणातून 100 दशलक्ष घनफूट अशाप्रकारे 5600 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी 18 एप्रिल 2022 पर्यंत गंगापूर धरण समूहातून 2703 दशलक्ष घनफूट, तर मुकणेतील 846 दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याचा वापर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहात 1296 दशलक्ष घनफूट, मुकणेत 653 दशलक्ष घनफूट, तर दारणातील 100 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. वाढलेल्या पाणी मागणीचा विचार करता महापालिकेतर्फे धरणांतून पाण्याची उचल वाढविण्यात आली आहे. याआधी नाशिककरांना दररोज सरासरी 530 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा धरणांतून केला जातो. गेल्या तीन महिन्यांपासून सरासरी दहा दशलक्ष लिटर पाण्याचा अतिरिक्त पुरवठा शहरवासीयांना केला जात आहे.
धरण एकूण आरक्षित साठा शिल्लक आरक्षित साठा
गंगापूरधरण समूह 4000 1296
दारणा 100 100
मुकणे 1500 653
एकूण 5600 2050