वॉशिंग्टन : ‘हबल’ने टिपले पाच आकाशगंगांचे मीलन | पुढारी

वॉशिंग्टन : ‘हबल’ने टिपले पाच आकाशगंगांचे मीलन

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘हबल’ या अंतराळ दुर्बिणीने आपल्या सेवेची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. या दुर्बिणीने अंतराळातील अनेक खगोल व खगोलीय घटनांना आपल्या कॅमेर्‍यात टिपून घेतलेले आहे. त्यामध्येच तब्बल पाच आकाशगंगांच्या मीलनाचेही एक अद्भूत द‍ृश्य ‘हबल’ने टिपले. यापैकी तीन आकाशगंगा वर्तुळाकार असून एक अंडाकार आहे तसेच एक आकाशगंगा भिंगासारखी आहे. पृथ्वीपासून 300 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर ही घटना घडली.

या आकाशगंगा गुरुत्वाकर्षणाच्या शक्‍तीमुळे एकमेकींकडे खेचून त्या एकमेकींमध्ये मिसळून जात होत्या. या घटनेतून खगोलशास्त्रज्ञांना अनेक अवकाशीय घटनांचे रहस्य समजून घेण्यासाठी मदत झाली. ‘हबल’ला हायड्रा नक्षत्रादरम्यान आकाशगंगांच्या मीलनाचे हे द‍ृश्य पाहायला मिळाले. 20 मे 1990 मध्ये पहिली प्रतिमा टिपल्यानंतर ‘नासा’ आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या या स्पेस टेलिस्कोपने अशा प्रकारच्या 15 लाख प्रतिमा कॅमेर्‍यात कैद केल्या आहेत. ही 43 फुटांची दुर्बीण 25 एप्रिल 1990 मध्ये ‘डिस्कव्हरी’ या यानाच्या सहाय्याने अंतराळात स्थापित करण्यात आली होती.

‘हबल’ने टिपलेल्या छायाचित्रातील पाच आकाशगंगांच्या समूहाला ‘हिक्सन कॉम्पॅक्ट ग्रुप 40’ (एचसीजी-40) असे म्हटले जाते. अशा आकाशगंगा सापडणे अत्यंत दुर्मीळ असते. ‘हबल’ दुर्बीण आता जुनी झाली असून तिच्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने आता 10 अब्ज डॉलर्सची जेम्स वेब टेलिस्कोप लाँच करण्यात आली आहे.

जंगलातल्या भारावून टाकणाऱ्या अचाट गोष्टी : अभिनेता हृदयनाथ जाधवसोबत | Ratris Khel Chale Fame Actor

Back to top button