नाशिक : जनहिताच्या योजना कायम राहतील – पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे | पुढारी

नाशिक : जनहिताच्या योजना कायम राहतील - पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या पोलिस आयुक्तांनी शहराच्या विकासासाठी व कायदा व सुव्यवस्थेसाठी ज्या योजना राबवल्या आहेत, त्या कायम राहतील. नाशिकच्या पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेत पोलिस सेवेस सुरुवात केली होती. आता नाशिकमध्ये पोलिस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने माझ्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले.

माजी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांची मुंबईला बदली झाल्यानंतर गुरुवारी (दि.21) सायंकाळी नूतन पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी सांगितले की, मागील पोलिस आयुक्तांनी जे-जे चांगले उपक्रम राबवले आहेत ते कायम राहतील. त्याचप्रमाणे भविष्यात काम करताना त्या योजनांमध्ये बदल करावयाचे असल्यास तेदेखील केले जातील. माझे पोलिस प्रशिक्षण नाशिकलाच झाल्याने मला या शहराची चांगली ओळख आहे. जनसामान्यांचे हित जोपासत कामकाज केले जाईल. यासाठी सर्वप्रथम अधिकार्‍यांकडून कामाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ग्राउंड रिअ‍ॅलिटीचा संपूर्ण अभ्यास करूनच काम केले जाईल, असा विश्वास नाईकनवरे यांनी व्यक्त केला. यावेळी पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, विजय खरात आदींनी आयुक्तांचे स्वागत केले.

काही चूक झाली तर माफ करा…
माजी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी गुरुवारी (दि.21) सकाळी पोलिस आयुक्तालयात दाखल होत प्रत्येक विभागात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांसोबत संवाद साधला. त्यानंतर त्यांनी वॉकीटॉकीवरून शहरातील पोलिसांना संदेश देत सर्वांचे आभार मानले. मला जसे सहकार्य केले तसेच नवीन आयुक्तांनाही तुम्ही सहकार्य कराल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे पोलिस आयुक्तालयाचा पदभार सोडताना त्यांनी आयुक्तालयाच्या आवारात उभे असलेल्या पोलिसांना ‘काही चूक झाली तर माफ करा’ असे सांगितले व सर्वांचा निरोप घेतला.

हेही वाचा :

Back to top button