चौदा पीएलआय योजनांद्वारे होणार २.३४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक | पुढारी

चौदा पीएलआय योजनांद्वारे होणार २.३४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन आधारित सवलत योजना (पीएलआय) हाती घेतली आहे. त्यानुसार देशात चौदा पीएलआय योजनांद्वारे 2.34 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पीएलआय योजनांमुळे किती प्रमाणात गुंतवणूक होऊ शकते, याची एकत्रित आकडेवारी सरकारकडून जमा करण्यात आली आहे.

ज्या क्षेत्रातील पीएलआय योजनेत सर्वाधिक स्वारस्य दाखविलेले आहे, त्यात वाहन आणि वाहनाचे सुटे भाग, अ‍ॅडव्हान्स्ड् केमेस्ट्री बॅटरीज, स्पेशालिटी स्टील तसेच हाय इफिशियन्सी सोलार पॅनेल्स या क्षेत्रांचा समावेश आहे. चौदा योजनांच्या पीएलआय योजनांमुळे 28.15 लाख कोटी रुपये किंमतीच्या वस्तुंची निर्मिती होणार आहे. शिवाय पुढील पाच वर्षाच्या कालावधीत 6.45 दशलक्ष लोकांना रोजगार मिळणार आहे. जवळपास सर्व क्षेत्रांनी पीएलआय योजनेत मोठे स्वारस्य दाखविले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

कोरोना संकटाला सुरुवात झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी देशाला सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या अनुषंगानेे केंद्र सरकारने पीएलआय योजना हाती घेतली होती. योजनेतील सहभागी कंपन्यांना तीन ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी रोख स्वरुपात सवलत दिली जाते. गुंतवणुकीचे प्रमाण आणि वार्षिक विक्रीच्या आधारावर ही सवलत देण्यात येते. पीएलआय योजनेमुळे विविध प्रकारच्या वस्तुंच्या निर्मितीत वाढ होईल, त्यामुळे आयातीवरचा भार कमी होईलच, शिवाय निर्यातीला देखील चालना मिळू शकेल, असे उद्योग-व्यापार क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button