नाशिक : श्वास गुदमरवणार्‍या घटनेस एक वर्ष; ऑक्सिजन गळती : 22 रुग्णांचा झाला होता मृत्यू | पुढारी

नाशिक : श्वास गुदमरवणार्‍या घटनेस एक वर्ष; ऑक्सिजन गळती : 22 रुग्णांचा झाला होता मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन भरत असताना अचानक गळती झाल्याने त्यातून ऑक्सिजन बाहेर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे व्हेंटिलेटरवर उपचार घेणार्‍या कोरोनाबाधितांना ऑक्सिजन मिळेनासा झाल्याने त्यांना जगण्यासाठी श्वास घेण्याचा प्रयत्न करावा लागला. मात्र, कोरोनामुळे शरीरातील प्राण संपल्यागत असतानाच श्वास घेण्यासाठी करावी लागणारी धडपड तोकडी पडली. नातलगांनीही रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी कोरोनाची भीती न बाळगता रुग्णांना तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला, तर कोणी छाती, हात-पाय चोळून रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणातच एकापाठोपाठ एक अशा 22 कोरोनाबाधितांनी जीव सोडला. कोणी नातलगांच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला, तर कोणी बेडवरच एकटा असताना जीव सोडल्याची हृदयद्रावक दुर्घटना 21 एप्रिल 2021 रोजी शहरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात घडली होती.

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल 2021 रोजी दुपारी 12.20 च्या सुमारास ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती लागल्याने ऑक्सिजनअभावी व्हेंटिलेटरवरील 22 कोरोनाबाधितांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या घटनेस एक वर्ष पूर्ण झाले असून, आजही त्या घटनेचा विचार केल्यास 22 कुटुंबीयांसह नाशिककरांच्या मनात धस्स होत आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात असलेल्या 13 केएल क्षमतेची ऑक्सिजन प्लांटमध्ये गळती लागली. ही दुर्घटना घडली त्यावेळी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 157 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 131 रुग्ण हे ऑक्सिजनवर, 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. ऑक्सिजन गळती झाल्यानंतर रुग्णांनी व त्यांच्या नातलगांनी जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र, ऑक्सिजनअभावी त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेक नातलग रुग्णांना काही क्षणांपूर्वीच भेटून बोलून बाहेर गेले. परत आल्यानंतर त्यांचा रुग्ण निपचित पडलेला दिसला. कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतानाच ही दुर्घटना घडल्याने देशभरात खळबळ उडाली होती.

अशी झालेली ऑक्सिजन गळती : टँकरमधून ऑक्सिजन रुग्णालयाच्या टाकीत भरण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर दाब वाढला. मात्र, दाब नियंत्रित न झाल्याने टाकीच्या पाइपमधून ऑक्सिजन गळती सुरू झाली होती. गळती सुरू झाल्याने द्रवरूप ऑक्सिजनचे बर्फाच्छादित लोट घटनास्थळी परसले होते. दुर्घटनेच्या वेळी ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ उपस्थित नसल्यामुळे वेळीच गळतीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही आणि मोठी दुर्घटना घडली.

यांची जगण्यासाठी अखेरची धडपड ठरली व्यर्थ (कंसात वय) : अमरदीप नगराळे (74), भारती निकम (44), श्रावण रामदास पाटील (67), मोहन देवराम खैरनार (60), मानसी सुरेंद्र शहा (36), पंढरीनाथ देवचंद्र नेरकर (37), सुनील झाल्टे (33), सलमा शेख (59), प्रमोद वाळुकर (45), आशा शर्मा (45), भैया सय्यद (45), प्रवीण महाले (34), सुंगधाबाई थोरात (65), हरीणबाई त्रिभुवन (65), रजनी काळे (61), गीता वाकचौरे (50), बापूसाहेब घोटेकर (61), वत्सलाबाई सूर्यवंशी (70), नारायण इरांक (73), संदीप लोखंडे (37), बुधा गोतरणे (69), वैशाली राऊत (46).

.. तरीही खाटा रिकाम्या नाही : एप्रिल 2021 मध्ये बहुतांश सर्वच रुग्णालयांमध्ये खाटा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा तुटवडा होता. दुर्घटना घडल्यानंतर अनेकांनी रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी इतर रुग्णालयांत रुग्णांना नेले. तर 22 बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात खाटा रिकाम्या झाल्या होत्या. या खाटा दुर्घटनेनंतर काही तासांतच पूर्ण भरल्या होत्या. तर अनेकांनी चटईवर उपचार घेतले. त्यावरून कोरोना प्रादुर्भावाच्या तीव—तेची जाणीव लक्षात येत होती.

गुन्हा अन् नुकसानभरपाई : या दुर्घटनेप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात पोलिसांनी फिर्याद देत अज्ञातांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने दुर्घटनेबाबत ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पुण्यातील ताईओ निप्पॉनला 22 लाख, तर नाशिकच्या जाधव ट्रेडर्सकडून दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बाधितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही देण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button