नाशिक बार असोसिएशन निवडणूक; 11 जागांसाठी 64 इच्छुकांचे अर्ज | पुढारी

नाशिक बार असोसिएशन निवडणूक; 11 जागांसाठी 64 इच्छुकांचे अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : नाशिक बार असोसिएशनच्या निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यात असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी चार वकिलांनी अर्ज सादर केले आहेत. उपाध्यक्षपदासाठी पाच, सचिवासाठी चार, सहसचिवसाठी आठ, महिला सहसचिवासाठी सात, खजिनदारासाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 11 पदांसाठी 64 अर्ज प्राप्त झाले आहे.

येत्या 6 मे रोजी जिल्ह्यात असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 ते 18 एप्रिल रोजी 11 पदांसाठी 111 अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी अंतिम मुदतीपर्यंत 64 वकिलांनी अर्ज सादर केले. त्यात विद्यमान पदाधिकार्‍यांसह नव्या उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत. अध्यक्षपदासाठी सलग दोन वेळा अध्यक्ष असलेले अ‍ॅड. नितीन ठाकरे यंदा पुन्हा निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्यासह अ‍ॅड. महेश आहेर, अ‍ॅड. दिलीप वनारसे आणि अ‍ॅड. अलका शेळके यांनी अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. प्रकाश अहुजा, अ‍ॅड. वैभव शेळके, अ‍ॅड. सुरेश निफाडे, अ‍ॅड. शरद गायधनी, अ‍ॅड. बाळासाहेब आडके या वकिलांनी अर्ज सादर केले आहेत. तर, तीन सदस्यांच्या जागांसाठी 18 वकिलांनी, महिला सदस्यपदासाठी सहा अर्ज दाखल आहेत. त्याचप्रमाणे सात वर्षांपेक्षा कमी सराव असलेल्या तीन सदस्यांच्या जागांसाठी सात अर्ज दाखल आहेत.

दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी (दि.21 व 22) उमेदवारांच्या अर्जांची छाननी, शुक्रवारी सायंकाळी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध, त्यानंतर शनिवारी व रविवारी (दि.23 व 24) उमेदवारी अर्ज माघारीसाठी कालावधी देण्यात आला आहे. सोमवारी (दि.25) निवडणुकीस पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 6 मे रोजी विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीतील तळमजल्यावर मतदान तर 7 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button