‘PMGKP’ अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेला मुदतवाढ | पुढारी

'PMGKP' अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेला मुदतवाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

कोरोना विरोधातील युद्धात आघाडीवर लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेला १९ एप्रिल २०२२ पासून पुढील १८० दिवसांची मुदतवाद देण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण निधी (PMGKP- Pradhan Mantri Garib Kalyan Package) अंतर्गत कर्मचाऱ्यांना या विमा योजनेचे कवच देण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेण्यासाठी नियुक्त केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे विमा संरक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना त्यासंबधी पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची काळजी घेणाऱ्या, त्यांच्या थेट संपर्कात असलेल्या अथवा त्याचा परिणाम होऊ शकणाऱ्या सार्वजनिक आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३० मार्च २०२० रोजी पीएमजीकेपी (PMGKP) योजना सुरु करण्यात आली. या अंतर्गत २२.१२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे सर्वसमावेशक वैयक्तिक अपघात संरक्षण विम्याद्वारे देण्यात आले आहे.

कोरोना महारोगराईसारख्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे, खासगी रुग्णालयातील कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, स्वयंसेवक, स्थानिक शहरी संस्था, कंत्राटी, दैनंदिन वेतन, ऍड-हॉक, आउटसोर्स केलेले कर्मचारी राज्य, केंद्रीय रुग्णालये, केंद्र-राज्ये, केंद्रशासित प्रदेशांची स्वायत्त रुग्णालये, एम्स आणि विशेषत: कोरोनाबाधितांच्या काळजीसाठी तयार केलेली केंद्रीय मंत्रालयांची राष्ट्रीय महत्त्वाची संस्था (आयएनआय), रुग्णालये देखील पीएमजीकेपी अंतर्गत येतात. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत, कोरोना संबंधित कर्तव्यांसाठी तैनात असताना मृत्यू झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे १९०५ दावे निकाली काढण्यात आल्याचे देखील मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : महागाईचा कळस I पुढारी | अग्रलेख

Back to top button