सोनिया गांधी पक्षासाठी ॲक्‍शन मोडमध्ये, प्रशांत किशोरांशी ४ दिवसांत तिसरी बैठक | पुढारी

सोनिया गांधी पक्षासाठी ॲक्‍शन मोडमध्ये, प्रशांत किशोरांशी ४ दिवसांत तिसरी बैठक

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान हे गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. पक्षासाठी सोनिया गांधी ॲक्‍शन मोडमध्ये आहेत. नुकत्‍याच पार पडलेल्या काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या भल्यासाठी काहीही करण्यास तयार आहोत असे त्‍यांनी सांगितले. मंगळवारी (दि.19) पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला निवडणुकीच्या बाबतीत काही टिप्स दिल्या आहेत. तर गेल्या ४ दिवसांत प्रशांत किशोर यांची सोनिया गांधींच्या घरी ही तिसरी बैठक होती. तत्पूर्वी सोमवारी (दि. 18) संध्याकाळीही ते सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आले होते. यावेळी प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या बैठकीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह, मुकुल वासनिक, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, आणि अंबिका सोनी हे उपस्थित होते. प्रशांत किशोर आणि काँग्रेस नेत्यांमध्ये 16 एप्रिलला पहिली बैठक झाली. तसेच आगामी काळात अशा आणखी दोन बैठका होऊ शकतात. प्रशांत किशोर यांनी राज्यांमध्ये एकट्याने किंवा आघाडीने लढण्याच्या दिलेल्या सूचनांना राहुल गांधी सहमत आहेत. पहिल्याच बैठकीत प्रशांत किशोर यांच्या वतीने प्लॅन 370 काँग्रेसला देण्यात आला. त्यात ते म्हणाले होते की, काँग्रेसने लोकसभेच्या केवळ 370 जागांवर लक्ष केंद्रित करावे. याशिवाय अन्य ठिकाणीही युती झाली पाहिजे.

यावेळी प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसने उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशासारख्या राज्यांमध्ये एकट्यानेच निवडणूक लढवायला हवी. याशिवाय तामिळनाडू, महाराष्ट्र, बंगाल या राज्यांमध्ये युती हवी. तर, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. परंतु त्‍याबाबत आतापर्यंत काहीही समोर आले नाही.

दरम्यान, केसी वेणुगोपाल म्हणाले होते की, प्रशांत किशोर यांची भूमिका काही आठवडयात समोर येऊ शकते. या वर्षअखेरीस होणाऱ्या हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकांबाबत पी.के. यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली आहे. यूपी, पंजाब आणि उत्तराखंडसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या काही नेत्‍यांना वाटते की, पी.के. यांच्या रणनीतीच्या मदतीने निवडणूकीत यश मिळवता येईल.

हेही वाचा  

Back to top button