सदावर्तेंची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये | पुढारी

सदावर्तेंची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये

सातारा : पुढारी वृत्तसेवा सातारा व कोल्हापूर येथील खासदार असलेल्या राजेंवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावण्यात आली. यामुळे रात्री उशिरा मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. दरम्यान, एमसीआर होताच बचाव पक्षाने दाखल केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

सातारा शहर पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दि. 14 रोजी आर्थर जेलमधून सकाळी ताब्यात घेतले व सांयकाळी सातार्‍यात आणून त्यांना अटक केली. दि. 15 रोजी त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी सुरु असताना सातारा पोलिसांनी तपासामध्ये त्यांच्या आवाजाचे नमुने घेतले. तसेच ज्याठिकाणी तक्रारदार यांनी दोन्ही राजेंवर बेताल वक्तव्य ऐकली त्या घटनास्थळाचा पंचनामा केला. यासह सदावर्ते यांची चौकशी झाली.

सोमवारी पोलिस कोठडी संपत असल्याने सातारा पोलिसांनी त्यांना सांयकाळी 5 वाजता लॉकअपमधून बाहेर काढले. न्यायालयात आणल्यानंतर 5.20 वाजता त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.व्ही.पाटील या न्यायाधिशांसमोर आणले. काही तक्रार आहे का? अशी विचारणा करताच सदावर्ते यांनी ‘कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.’ यावेळी सरकार पक्षाच्यावतीने पोलिस व अ‍ॅड. राहूल काजळे यांनी युक्तिवाद करत आणखी पोलिस कोठडीची मागणी केली. यावेळी यापाठीमागे कोणती संघटना आहे का? आणखी कोणी संशयित आरोपी आहेत का? याचा तपास करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. शामप्रसाद बेगमपुरे यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, मुळातच पोलिस कोठडीची आवश्यकता नव्हती. तरीही कोर्टाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आणखी कोठडी मागून वेळ वाया घालवत आहेत. पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधिशांनी न्यायालयीन कोठडी देत असल्याचे लगेच सांगितले. हा युक्तिवाद व निर्णय अवघ्या 10 मिनिटांमध्ये झाला.

न्यायाधिशांनी न्यायालयीन कोठडी देताच सदावर्ते यांच्यावतीने वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. यावर पुन्हा सरकार पक्ष, बचाव पक्ष व फिर्यादीच्यावतीने वकीलांनी जोरदार युक्तिवाद केला. हा युक्तिवाद सुमारे 30 मिनिटे चालला. युक्तिवाद झाल्यानंतर जामीन होणार का? याकडे लक्ष असतानाच न्यायाधिशांनी जामीन अर्जावर आज (मंगळवारी) निकाल देणार असल्याचे सांगितले. 6.15 मिनिटांनी गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टातून बाहेर काढण्यात आले व सातारा शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिस ठाण्यातील प्रक्रिया झाल्यानंतर रात्री लगेच सदावर्ते यांना आर्थर जेलमध्ये घेवून जाणार असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली. दरम्यान, सोमवारी लॉकअप व सातारा जिल्हा न्यायालय येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी सातारा शहर, एलसीबी, जिल्हा विशेष शाखा, शाहूपुरी, सातारा तालुका व बोरगाव पोलिस ठाण्याचे पोलिसांसह आरसीपीची एक तुकडी तैनात होती.

म्हणून आर्थर जेलात सदावर्तेंची रवानगी.. 

सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा मुंबई कोर्टाच्या माध्यमातून आर्थर जेलमधून घेतला आहे. यामुळे नियमानुसार सातारा पोलिसांना सदावर्ते यांना तेथेच पुन्हा न्यावे लागणार आहे. आता ज्या पोलिसांना त्यांचा ताबा पाहिजे त्यांनी मुंबई कोर्टात अर्ज करून आर्थर जेलमधून सदावर्ते यांचा ताबा घ्यावा लागणार आहे. दरम्यान, सदावर्ते यांच्या जामिनावर मंगळवारी निर्णय होणार असला तरी ते इथे उपस्थित असावे, असे काही नाही. यामुळे सोमवारी रात्री त्यांची रवानगी आर्थर जेलमध्ये करण्यात आली.

Back to top button