कोल्हापूर : भीमसागर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका

कोल्हापूर : भीमसागर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 'बोलो रे बोलो, जयभीम बोलो', 'जगात गाजावाजा भीमराव एकच माझा' असा जयघोष करत मंगलमयी वातावरणात शहरात ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. डॉ. आंबेडकर यांना अभिवादनासाठी अवघे शहर भीममय झाले होते.

सिद्धार्थनगर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे गुरुवारी सकाळी 10 वाजता बुद्धविहारात ध्वजवंदन, बद्धवंदना झाली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, समाजकल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, महापालिका उपायुक्त शिल्पा दरेकर यांची उपस्थिती होती. सायंकाळी पाच वाजता उत्सव समितीतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. माजी आमदार मालोजीराजे, जयश्री जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. दोन वषार्र्ंनंतर डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी होत असल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये चैतन्य होते.

सिद्धार्थनगर येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. लेसर शो, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर आंबेडकरी कार्यकर्ते बेभान होऊन नाचले. निळे झेंडे, पांढर्‍या साड्या, निळे फेटे परिधान केलेल्या महिला, पुरुषांसह आबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले होते. सिद्धार्थनगर कला क्रीडा मंचच्या लहान मुलांच्या लेझीम पथकाने वाद्यांच्या गजरात ठेका धरत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दसरा चौक, बिंदू चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, शनिवार पेठ, बुधवार पेठ मार्गे सिद्धार्थनगर येथे मिरवणुकीची रात्री उशिरा सांगता झाली.

सिद्धार्थ चौक, विचारे माळ परिसराची मिरवणूक

सिद्धार्थ चौक, विचारे माळ परिसराच्या वतीने भव्य मिरवणूक आणि भीम गीतांचा जागर करत डॉ. आंबेडकरांना विनम— अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये आबालवृद्धांचा मोठा सहभाग होता. आकर्षक विद्युत रोषणाई करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ठेवली होती. महिलांनी पांढर्‍या शुभ— साड्या, तर तरुणांनी निळ्या रंगाचे फेटे व सलवार परिधान केले होते. हातात निळे ध्वज घेऊन मोठ्या उत्साहात तरुणाई भीम गीतांवर थिरकली. सिद्धार्थ चौक येथून मिरवणूक छत्रपती ताराराणी चौक, मध्यवर्ती बसस्थानक, व्हीनस कॉर्नर, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौकात आली. तेथे मिरवणुकीचा समारोप झाला. सिद्धार्थनगर, विचारे माळ परिसरात घराघरांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन केले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मिरवणूक मार्गावर पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

मिरवणुकीत ट्रॅक्टर-ट्रॉलीवर गौतम बुद्ध, डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. ज्ञानाच्या महासागराचा नौकेतून सागरी प्रवास (कोलंबिया युनिव्हर्सिटी), संसद भवन प्रतिकृती, भारतीय राज्यघटना आदी देखावे आकर्षण ठरले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news