नाशिक : तीन तालुक्यांतील सात गावांत टँकर ; येवला, चांदवडमधून प्रस्ताव | पुढारी

नाशिक : तीन तालुक्यांतील सात गावांत टँकर ; येवला, चांदवडमधून प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तीन तालुक्यांमधील सात गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. त्यामध्ये येवल्यातील 3, तर बागलाण व सिन्नरमधील प्रत्येकी दोन गावांचा समावेश आहे. प्रशासनाकडे चांदवड व येवल्यातून टँकरसाठी प्रस्ताव आले असून, लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. एप्रिलच्या मध्यातच पारा 40 च्या आसपास स्थिरावला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना तीव— उकाड्यालाच सामोरे जावे लागत आहे. वाढत्या उन्हाच्या तडाख्यासोबत ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. तसे प्रस्ताव आता जिल्हा प्रशासनाकडे येऊ लागले आहे.

जिल्हा प्रशासनाने नुकतेच तीन तालुक्यांतील सात गावांसाठी टँकर सुरू केले आहेत. त्यामुळे या सातही गावांमधील ग्रामस्थांची तहान भागण्यास मदत झाली आहे. टँकर सुरू केलेल्या गावांमध्ये येवल्यातील मौजे आहेरवाडी, हडपसावरगाव आणि मौजे जायदरे यांचा समावेश आहे. याशिवाय सिन्नरमधील डुबेरेवाडी व वडगाव तसेच बागलाण तालुक्यातील रातीर आणि रामतीर या गावांमध्येही प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. दरम्यान, येवल्यातील दोन ते तीन गावे तसेच चांदवड तालुक्यातील काही गावांचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. लवकरच या गावांनाही टँकर दिले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

संभाव्य टँकर 167
जिल्ह्याचा चालू वर्षी आठ कोटींचा टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या आराखड्यात जिल्ह्यातील 305 गावे तसेच 530 वाड्या अशा 835 ठिकाणी संभाव्य टंचाई गृहीत धरली आहे. या सर्व ठिकाणी पाणीपुरवठ्यासाठी 167 संभाव्य टँकर निवारणासाठी गृहीत धरले आहे.

हेही वाचा:

Back to top button