डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सांगलीशी ऋणानुबंध | पुढारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सांगलीशी ऋणानुबंध

सांगली; गणेश कांबळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांगली जिल्ह्याशी निगडित अशा अनेक आठवणी आहेत. सांगली, मिरज या शहरांसह पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावालाही त्यांनी भेट दिली होती. त्यांचे काही जाहीर स्वरूपाचे कार्यक्रमही झाले होते. त्याच्या आठवणी सांगणारी काही मंडळी आजही आहेत. या लोकांनी

मिरज येथील दलित समाजाची जागा रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या वापरासाठी ताब्यात घेतली होती. त्यामुळे ती मंडळी भूमिहीन झाली होती. या लोकांनी आपली ही व्यथा डॉ. बाबासाहेबांच्या कानावर घातल्यानंतर बाबासाहेबांनी त्या संदर्भात खटला दाखल करून दलित समाजाला त्यांची जागा परत मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. त्यासाठी काहीवेळा ते मिरज येथे येऊन गेल्याच्या आठवणी काही जुनी-जाणती मंडळी अजूनही सांगतात.

मिरजेला याच कामानिमित्त आले असताना त्यांना समजले की, सांगली येथे दलित समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांनी सांगलीतील सिद्धार्थनगर परिसरात दलित समाजासाठी जाहीर सभा घेण्याचा, त्यांचे प्रबोधन करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार सांगलीतील सिद्धार्थनगरमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

सभेचे नियोजन सकाळी अकरा वाजता होते. पण, बाबासाहेब आपल्या समाजाची इथली परिस्थिती जवळून पाहण्यासाठी म्हणून सकाळी आठ वाजताच दाखल झाले. पण, त्या ठिकाणी अजून सभेचे नियोजन आणि तयारीच सुरू होती. तेव्हा सभेची तयारी होईपर्यंत सहज फिरून यावे, शेतीवाडीची पाहणी करावी म्हणून बाबासाहेब तिथल्या शेतीची पाहणी करीत बांधावरून जात होते. तिथल्याच एका शेतकर्‍याला या शहरी पाहुण्यांविषयी कुतूहल वाटले आणि त्याने शेतातील एक ऊस काढून बाबासाहेबांना खाण्यासाठी दिला. बाबासाहेबही तो ऊस खात तिथल्याच एका कट्ट्यावर बसले. गप्पांच्या ओघात बाबासाहेबांनी आपली ओळख सांगताच, त्या शेतकर्‍याने बाबासाहेबांना तिथल्या तिथे दंडवत घातला आणि म्हणाला “तुमचे पाय माझ्या शेताला लागले. माझ्या जन्माचे सार्थक झाले!” लोकांच्या मनात बाबासाहेबांविषयी कशा प्रकारचा आदरभाव होता, हे या घटनेवरून लक्षात यायला हरकत नाही.

अंकलखोप आणि आरगला बाबासाहेबांच्या अस्थी आल्या

बाबासाहेबांच्या चळवळीत देशभरातील अनेक दलित समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आरग (ता. मिरज) येथील धोंडीराम श्रावण कांबळे व त्यांचे बंधू गुंडू श्रावण कांबळे हे नेहमी सावलीसारखे बाबासाहेबांच्या सोबत असायचे. धोंडीराम यांच्या भारदस्त खांद्यावर हात ठेवून बाबासाहेब स्टेजवर चढउतार करायचे. या धोंडीराम कांबळेंनी बाबासाहेबांच्या अशा कित्येक सभांच्या आणि बाबासाहेबांच्या आठवणी आपल्या हृदयात शेवटपर्यंत सांभाळून ठेवल्या होत्या.

एक दिवस बाबासाहेबांनी धोंडीरामला विचारले, “काय करतोस”, धोंडीराम म्हणाले, ‘तमाशात काम करतो.’ तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले, “आजपासून तमाशा बंद. गावी जा. मुलांना शिक्षण दे आणि समाजाच्या प्रबोधनाचे काम करीत जा.” त्यानंतर ते गावी आले आणि बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावरून काम करू लागले. बाबासाहेबांची चळवळ आरग भागासह सीमाभागात रुजविण्याचे काम या धोंडीराम कांबळेंनी शेवटपर्यंत केले. कांबळे बंधूंनी बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर अस्थी घेऊन आले. काही अस्थी पोस्टाने आल्या. आरग येथे स्मारक उभे राहिले आहे.

अंकलखोप (ता. पलूस) या ठिकाणचे कार्यकर्ते यशवंत दादू लांडगे, गणपत महादू लांडगे, मारुती रामचंद्र लांडगे, लमा लखू लांडगे हे मुंबईला रेल्वेने गेले. बाबासाहेबांच्या अस्थी घेऊन आले. त्यानंतर बाबासाहेबांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर, दादासाहेब रुपवते, बी. सी. कांबळे, बाबू आवळे, पी. टी. मधाळे यांच्या उपस्थितीत अस्थींचे पूजन केले. आजही या दोन्ही गावांत बाबासाहेबांच्या अस्थी जपून ठेवल्या आहेत. त्यानंतर या दोन्ही ठिकाणी भव्य स्मारके उभी राहिली आहेत. अस्थींच्या रुपाने बाबासाहेब जिल्ह्यातील आणि या दोन गावांमधील लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशा एक ना अनेक आठवणी सांगली जिल्ह्याशी निगडित आहेत. आज डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.

बाबासाहेब बसलेल्या कट्ट्याची काळजी

बाबासाहेब सांगलीतील सिद्धार्थनगर परिसरातील शेतात ऊस खात ज्या कट्ट्यावर बसले होते, त्या कट्ट्याची तेथील शेतकर्‍यांनी आयुष्यभर काळजी घेतली. बाबासाहेबांच्या नंतर कुणालाही त्या कट्ट्यावर पाय ठेवू दिला नाही. शेवटपर्यंत त्या कट्ट्याची सेवा केली. ही घटना बाबासाहेबांच्या चळवळीतील कार्यकर्ते पी. बी. पिसाळ यांनी आपल्या ‘मी पावन झालो’ या पुस्तकात लिहून ठेवली आहे.

कार्यकर्त्यांनीच पुढाकार घ्यावा : धम्माचारी ज्ञानसेन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचा प्रसार करणारे धम्माचारी ज्ञानसेन म्हणाले, बाबासाहेबांनी खूप मोठे कार्य केलेले आहे. त्यांच्या अस्थी अंकलखोप व आरग येथे आणल्या आहेत. त्या ठिकाणी आता भव्य स्मारकही उभे राहिले आहे. सरकारने त्यांचे काम केलेले आहे. परंतु आता सरकारची वाट न पाहता कार्यकर्त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या विचाराचा प्रसार करण्याचे काम हाती घेतले पाहिजे. सर्वांनी जिल्ह्यात मोहीम उघडली पाहिजे.

Back to top button