नाशिक : विल्होळी प्राथमिक शाळेत टवाळखोर मद्यपींचा उच्छाद  | पुढारी

नाशिक : विल्होळी प्राथमिक शाळेत टवाळखोर मद्यपींचा उच्छाद 

सिडको : पुढारी वृत्तसेवा : विल्होळी गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शालेय आवारात मद्यपींचा धिंगाणा घातल्याचा प्रकार नित्याचा झाला असून शाळेतील विविध मौल्यवान वस्तूंची तोडफोड केली जात आहे. मंगळवार (दि.१३) शाळेतील वर्गाची खिडकी फोडून एलसीडी फोडल्याबाबत तालुका पोलिस स्थानकात तक्रार दाखल करावयास गेलेल्या शालेय समिती सदस्यांना पोलिसांचे सहकार्य मिळाले नाही.

विल्होळी गावातील मद्यपींचे ठिकठिकाणी टोळके दिसत असून विद्येच्या मंदिरातही त्यांचा मोर्चा वळालेला आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत मद्यपींच्या ओल्या पार्ट्या रंगू लागल्या असल्याने त्याविरोधात ग्रामस्थांनर आवाज उठविला असता त्यांना देखील त्रास दिला जात आहे. तर तक्रारदाराला पोलिसांकडून सहाय्य मिळत नाही. तर शालेय समिती सदस्यांना देखील तक्रारीसाठी तालुका पोलिस स्थानकात ताटकळत थांबावे लागत आहे. दोन दिवसापूर्वी शाळा सुटल्यानंतर रात्रीच्या वेळेस काही टवाळखोरांनी वर्गाची खिडकीचे गज तोडून एलसीडीवर दगडफेक केली. तसेच जुगारी, टवाळखोर शाळेच्या मागच्या बाजूस संरक्षण भिंतीवरून उड्या मारुन आत प्रवेश करत ओल्या पार्ट्या करत आहेत. याबाबत शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही टवाळखोरांवर  कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शासकीय अनुदानातून पुरेशी सुविधा पुरवणे शक्य होत नसल्याने अखेर लोकवर्गणीतून एलसीडी टीव्ही, प्रोजेक्टर, शालेय साहित्य, शालेय रंगरंगोटी, वर्ग बांधणी, प्रयोगशाळा साहित्य, संरक्षण भिंती वरील चित्र अशा अनेक प्रकारची मदत करण्यात आली. मात्र लोकवर्गणीतून शालेय वस्तूंचे टवाळखोरांकडून नुकसान होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे टवाळखोर मद्यपींवर कडक कारवाई करण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समिती व विल्होळी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button