जिंतूर : पुढारी वृत्तसेवा : उघड्यावर पडलेल्या जिलेटीनच्या कांड्या मोबाईलच्या बॅटरीला लावल्याने मोठा स्फोट झाला. यात दोन मुले गंभीर जखमी झाली. ही घटना एकलव्य शाळा परिसरात आज (बुधवार) दुपारी १२ च्या सुमारास घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. एवढ्या स्फोटकांच्या कांड्या रस्त्यावर आल्या कोठून ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील नवीन एकलव्य शाळा परिसरात राहणारे शेख असलम (वय ११) व अनस शाहेद पठाण (वय ९) हे घराजवळ खेळत होते. यावेळी रस्त्याच्या बाजूला कचऱ्यात मोठ्या प्रमाणात वायर असलेल्या जिलेटीन कांड्या त्यांना दिसून आल्या. त्या दोघांनी या कांड्या जुन्या मोबाईलच्या बॅटरीला वायरने जोडले असता कांड्यांचा मोठा स्फोट झाला. यावेळी अस्लम शेख याचा हातात जिलेटीन असल्यामुळे त्याच्या हाताला व डोळ्याला जखमी झाली. जवळच असलेल्या अनस पठाण याच्याही डोळ्याला गंभीर इजा झाली.
यावेळी नागरिकांनी दोघा जखमींना तातडीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, जिलेटीनसारखी स्फोटके शहरातील नागरीवस्तीमध्ये आढळून आल्यामुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील संबंधित व्यवसाय करणाऱ्यांनी जिलेटीनचा साठा कुठे केला आहे का ?, याबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी करणे गरजेचे आहे. आता यावर महसूल व पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
हेही वाचलंत का ?