नाशिक : गोदापात्रातील मातीच्या भरावास याचिकाकर्त्याची हरकत | पुढारी

नाशिक : गोदापात्रातील मातीच्या भरावास याचिकाकर्त्याची हरकत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटीच्या वतीने रामवाडी पुलाजवळील गोदापात्रात मातीचा भराव टाकण्याचे ’स्मार्ट काम’ सुरू असून, यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. या कामाला याचिकाकर्ता निशिकांत पगारे यांनी हरकत घेतली असून, उच्च न्यायालय आदेशित समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

स्मार्ट सिटी प्रशासनाने रामवाडी पूल येथे अहिल्यादेवी होळकर पुलाच्या वरच्या बाजूला गोदावरी नदीपात्रात मोठया प्रमाणावर मातीचा भराव टाकून नदीपात्र अरुंद करून गोदावरी नदीचे अस्तित्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे पगारे यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे. याच ठिकाणी स्मार्ट सिटी प्रशासनाने गोदावरी नदीत निळ्या पूररेषेत बेकायदेशीररीत्या सिमेंट काँक्रीटची भिंत बांधलेली आहे. या भिंतीलादेखील पगारे यांनी यापूर्वीच विरोध केलेला असून, या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशानुसार गॅबियन पद्धतीची भिंत बांधण्याची त्यांची मागणी आहे. गोदावरी नदीपात्रात भराव टाकून नदीपात्र अरुंद करणार्‍या प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. या पत्राची प्रत विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकार्‍यांना पाठविण्यात आली आहे.

नैसर्गिक साधनांची हानी करून, पर्यावरणाचा समतोल बिघडवून शहर तयार करणे म्हणजे स्मार्ट सिटी नव्हे. तर पर्यावरणाचे रक्षण करत शहराची निर्मिती करणे हे स्मार्ट सिटीमध्ये अभिप्रेत आहे.
– निशिकांत मु. पगारे, याचिकाकर्ता, नाशिक

हेही वाचा :

Back to top button