नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील नायगाव शिवारात विद्युत वाहिन्यांतून पडलेल्या ठिणगीने 4 शेतकर्यांचा पाच बिघे (अडीच एकर) ऊस जळून खाक झाला आहे.
नायगाव येथे रविवारी (दि.10) सकाळी 11 वाजेच्या सुमारास गोपाळ भीमराव जेजूरकर यांच्या शेतातून जाणार्या विद्युत तारांवर पाखरे बसल्याने तारांचे घर्षण होऊन त्यातून पडलेल्या ठिणगीमुळे उसाच्या पिकाने पेट घेतला. वारा वाहात असल्याने अवघ्या 20 मिनिटांत बाजूलाच असणार्या सोपान तुकाराम भांगरे, संजय कचेश्वर जेजूरकर, दिगंबर अंबादास जेजूरकर यांच्या शेतातील उसात आग पसरली. यात सोपान भांगरे यांचा सर्वाधिक अडीच बिघे ऊस जळून खाक झाला आहे. वार्यामुळे पसरणारी आग एका बाजूने विझवण्यात ग्रामस्थांना यश आले. शेजारीच शेतात विद्युत पंपाद्वारे पाणी सुरू होते. तसेच युवकांनी उसाचे वाढे व झाडांच्या फांद्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
शेतातले विद्युत खांब वाकल्याने तारांमध्ये झोळ पडला आहे. याबाबत शेतकर्यांनी महावितरण कर्मचार्यांना वेळोवेळी तोंडी माहिती देऊनही कर्मचार्यांकडून कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आली नाही. महावितरण कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. शेतकर्यांनी महावितरणच्या या गलथान कारभाराबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.