सततच्या भूकंपांनी हादरतोय ‘लाल ग्रह’ | पुढारी

सततच्या भूकंपांनी हादरतोय ‘लाल ग्रह’

सिडनी : ‘लाल ग्रह’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मंगळावर सध्या रहस्यमयी भूकंप होत आहेत. यामुळे तमाम खगोलशास्त्रज्ञही चकित झाले आहेत. कारण, अशा प्रकारच्या भू-गर्भीय हालचाली इतक्या मोठ्या प्रमाणात यापूर्वी मंगळावर कधीच पाहण्यात आलेल्या नव्हत्या. यापूर्वीही मंगळावर भूकंप होत होते. मात्र, यावेळी या भूकंपांची तीव्रता आणि संख्याही मोठी आहे.

सातत्याने होत असलेल्या भूकंपांमुळे मंगळाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात हालचाली वाढल्याचे निष्पन्‍न होत आहे. यामुळेच भूकंपाची तीव्रता आणि संख्या वाढू लागली आहे. ऑस्ट्रेलियास्थित ‘ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी’चे जियोफिजिस्ट हरव्होए क्‍लासिक यांनी सांगितले की, मंगळ ग्रहाचा मेंटल हा भाग आता समजून घेणे महत्त्वाचे ठरले आहे. हे जर आपण समजून घेतले, तर तेथे भूकंप का होत आहेत? याचे उत्तर मिळू शकेल. तसेच या माध्यमातून मंगळ कसा विकसित झाला? तसेच सूर्यमालेतील अन्य ग्रहांची निर्मिती कशी झाली, याचेही उत्तर मिळू शकेल.

यापूर्वी खगोलशास्त्रज्ञांची अशी समजूत होती की, मंगळ अत्यंत शांत ग्रह आहे. येथे कोणत्याच हालचाली होत नसल्याने हा ग्रह मृत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, अलीकडच्या भूकंपांनी सिद्ध केले की, मंगळ हा ग्रह पूर्णपणे जीवित असून, तो पूर्णपणे सक्षम आहे. लाल ग्रहासंबंधीचे हे महत्त्वपूर्ण संशोधन ‘नेचर’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button