सप्तशृंगगड : रणरणत्या उन्हात भाविक गडाच्या वाटेवर | पुढारी

सप्तशृंगगड : रणरणत्या उन्हात भाविक गडाच्या वाटेवर

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंग गडावर चैत्रोत्सवाला रविवारी (दि. 10) प्रारंभ झाला आणि त्यासोबत खानदेशातील भाविकांनी गडाची वाट धरली. 42 अंश सेल्सिअसवरील रणरणत्या उन्हात भाविकांचे जत्थे मजल दरमजल करीत मार्गक्रमण करत आहेत. कोरोना साथीमुळे दोन वर्षे कोणताच उत्सव होऊ शकला नाही. आता मात्र साथ नियंत्रणात आल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पायी जाणार्‍या भाविकांसाठी मालेगाव शहरासह मार्गात ठिकठिकाणी सेवा-सुविधा केंद्रेही कार्यान्वित झाली आहेत. सटाणा नाका भागातील यशश्री कंपाउंडमध्ये अन्नछत्रही सुरू झाले आहेत. ठिकठिकाणी सावली व पाण्याची व्यवस्था होत आहे. रविवारी दुपारपर्यंत कमी असलेली भाविकांची संख्या रात्रीतून मोठ्या संख्येने वाढण्याची शक्यता आहे. यंदा मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. येत्या 16 तारखेला मध्यरात्री पौर्णिमा समाप्ती आहे. शुक्रवारी (दि. 15) रात्री दोन वाजून 25 मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होईल. तेव्हा शिखर ध्वज पूजन होणार आहे. या सोहळ्यासाठी आबालवृद्ध भाविक निघाले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मुंबई – आग्रा महामार्ग ते कळवण रस्त्यावर भाविकांची मांदियाळी असेल.

‘रोटरी आय’ करणार भाविकांची पाच दिवस मोफत नेत्र तपासणी
रोटरी चॅरिटी ट्रस्ट संचलित रोटरी आय हॉस्पिटलतर्फे सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवासाठी पायी जाणार्‍या भाविकांसाठी पाच दिवसीय नेत्र तपासणी शिबिर घेणार आहे. खानदेश पट्ट्यातून आदिमायेच्या दर्शनासाठी हजारो भाविक उन्हा-तान्हाची पर्वा न करता, गडावर पायी जाण्याची परंपरा गेली अनेक वर्षे सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे या भाविकांच्या डोळ्यांना इजा होण्याची शक्यता निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून यावर्षी रोटरी आय हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स भाविकांची मोफत नेत्र तपासणी करणार आहेत. रोटरी हॉस्पिटलच्या सेवेत अलीकडेच सुसज्ज मशीनरी असलेली व्हॅन दाखल झाली आहे. गरज असल्यास डोळ्यांची आग कमी होण्यासाठी तसेच डोळ्यांच्या इतर व्याधींसाठी हॉस्पिटलतर्फे औषधेही मोफत पुरविण्याचा प्रयत्न असेल. हे शिबिर दि. 11 ते 15 एप्रिल या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत द्वारकामणी हॉस्पिटलसमोर, यशश्री कंपाउंडशेजारी सटाणा रोड येथे घेण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो भाविकांना मोफत नेत्र तपासणीचा लाभ होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button