अ‍ॅड. सदावर्तेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मालेगावी दहन | पुढारी

अ‍ॅड. सदावर्तेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मालेगावी दहन

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आंदोलक शेतकर्‍यांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे देण्यात आली. याप्रसंगी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

एसटी कर्मचार्‍यांच्या आडोशाने भाजपच्या गुंडांनी ज्येष्ठ नेते पवार यांच्या निवासस्थानावर असंविधानिक हल्ला केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रसंगी ‘जिंदाबाद जिंदाबाद पवार साहेब जिंदाबाद’, ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार’ अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप पवार, शहर कार्याध्यक्ष आनंद भोसले, मालेगाव विधानसभा अध्यक्ष विनोद चव्हाण आणि राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव दिनेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. याप्रसंगी ठाकरे, चव्हाण, बाळू दशपुते यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनाच्या नावाखाली मागील सहा महिन्यांपासून अ‍ॅड. सदावर्ते हे शरद पवार यांच्याबद्दल एसटी कर्मचार्‍यांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचे काम करीत होते. वास्तविक, राष्ट्रवादी एसटी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच मदत करत आली म्हणून भाजपेयींच्या मनात असूया निर्माण झाली. तसेच देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न ज्येष्ठ नेते पवार यांनी साकार होऊ दिले नाही, याचा राग भाजप पदाधिकार्‍यांच्या मनात कायम आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. याचाच पुढील अध्याय ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्यात लिहिला गेला, असा आरोप यावेळी झाले.

यापुढील काळात भाजपच्या नेत्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी विजय दसपुते, विजय पवार, किशोर इंगळे, नंदकुमार सावंत, जयेश आहिरे, मनमोहन शेवाळे, चेतन देवरे, योगेश बागूल, राहुल पवार, कल्पेश गायकवाड, प्रकाश वाघ, महेश शेरेकर, भाऊसाहेब पवार, प्रवीण पवार, मयूर ठाकरे, विनायक माळी, सुचेता सोनवणे, हेमलता मानकर, शीतल खैरनार, वैशाली मोरे, पुष्कर सूर्यवंशी, सिद्धांत बोराळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button