पवारांच्या घरावर हल्ला; आणखी काही एसटी कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात! | पुढारी

पवारांच्या घरावर हल्ला; आणखी काही एसटी कर्मचाऱ्यांना घेतलं ताब्यात!

मुंबई; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरांवर हल्ला केल्याप्रकरणी आणखी काही एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. काल (दि.१०) या कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी १०९ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यातील काही जण महामंडळाचे कर्मचारी असतील तर त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या आज सोमवारी होणार्‍या आढावा बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या २७ ऑक्टोबरपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. संपकरी कर्मचारी जर २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर मेस्मा लावता येऊ शकतो का, याचा विचारदेखील आजच्या बैठकीत होणार आहे.

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर गेल्या शुक्रवारी एसटी कर्मचारी आंदोलकांनी दगड, चपला भिरकावल्या होत्या. यामुळे तणाव निर्माण झाला होता. शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर शुक्रवारी दुपारी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी षड्यंत्र रचल्याचा आरोप ठेवत आंदोलनकर्त्या एसटी कर्मचार्‍यांचे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर भा.दं.वि. 141, 149, 332, 353 आणि 120 ब अन्वये गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली होती.

तसेच या हल्ल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात १०९ जणांविरोधात कट रचून दंगल घडवून आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एसटीतील कर्मचार्‍यांसह अन्य आंदोलनकर्ते आणि २३ महिलांचा समावेश आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते सध्या पोलिस कोठडीत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button