नाशिक : ‘महसूल’च्या आंदोलनासाठी परवानगी नाकारली ; पोलिसांचे चर्चेसाठी निमंत्रण | पुढारी

नाशिक : ‘महसूल’च्या आंदोलनासाठी परवानगी नाकारली ; पोलिसांचे चर्चेसाठी निमंत्रण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या ‘लेटरबॉम्ब’बद्दल महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे सोमवार (दि.11)पासून विभागीय आयुक्लायात आंदोलन करण्यात येणार होते. पण पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आंदोलनासाठी नव्याने परवानगी घेण्याची तयारी अधिकारी महासंघाने केली. दरम्यान, पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे.

पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी पोलिस महासंचालकांना दिलेल्या पत्रात महसूल विभागाच्या अधिकार तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले होते. त्यामुळे संतापलेल्या महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पाण्डेय यांनी बिनर्शत माफी मागावी. अन्यथा सोमवार (दि.11)पासून आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदोलनासाठी महासंघाने परवानगीदेखील मागितली. परंतु, सहायक पोलिस आयुक्त अंबादास भुसारे यांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील जमावबंदीचे कारण पुढे केले आहे. त्यामुळे नव्याने रीतसर परवानगी घेत आंदोलन करण्याची तयारी संघटनांनी केली आहे.

पोलिस उपआयुक्त अंबादास भुसारे यांनी आंदोलनाला परवानगी नाकारताना महसूल संघटनेच्या पदाधिकार्‍यांना सोमवारी (दि.11) सकाळी 10:30 वाजता पोलिस आयुक्त कार्यालयात चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. पण संघटनेचे पदाधिकारी हे निमंत्रण स्वीकारण्याबाबत साशंक आहे.

पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याविरुद्ध आंदोलनासाठी रीतसर परवानगी मागितली होती. पण पोलिस आयुक्तालयाने ती नाकारली आहे. आम्ही कायदा मानणारे असून, सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहोत. उद्याचे आंदोलन पुढे ढकलले असून, आंदोलनासाठी नव्याने परवानगी घेण्यात येईल. तेव्हा ती नाकारल्यास थेट मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येईल.
– शशिकांत मंगरूळे, सहसचिव, तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना

हेही वाचा :

Back to top button