जळगाव : आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांचा मुलांकडून चाकूने वार करून खून | पुढारी

जळगाव : आईच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या वडिलांचा मुलांकडून चाकूने वार करून खून

जळगांव; पुढारी वृत्‍तसेवा : आईच्या चारित्र्यावर वडिलांनी घेतलेल्या संशयामुळे घरात झालेल्या टोकाच्या भांडणातून दोघा मुलांनी पित्यावर धारदार चाकूचे सपासप वार केले आणि यात पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाचोरा शहरातील भास्कर नगरात घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रिकल व्यावसायीक असून, त्यांचे पाचोरा शहरात इलेक्ट्रीकलचे दुकान आहे. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत असल्याने कुटुंबात शनिवारी रात्री त्‍यांच्यात जोरदार भांडण झाले व मध्यरात्रीपर्यंत हा प्रकार सुरूच होता.

आईच्या चारित्र्यावरील संशयामुळे चिडलेल्या संशयीत रोहित खेडकर (वय 22) व प्रतीक खेडकर (24) यांनी घरातील धारदार चाकूने वडील संजय बंकट खेडकर (46) यांच्या पोटावर, पाठीवर व डोक्यावर सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रविवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक भारत कातकाडे, पोलिस निरीक्षक नजन किसन पाटील व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. संजय बंकट खेडकर (46) यांच्या खून प्रकरणी संशयीत आरोपी रोहित खेडकर व प्रतीक खेडकर या दोन्ही भावंडांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button