नाशिक : नवीन बिटकोत लवकरच ओपीडी ; मनपा आयुक्तांकडून पाहणी | पुढारी

नाशिक : नवीन बिटकोत लवकरच ओपीडी ; मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जुन्या बिटको रुग्णालयातील ओ.पी.डी. व इतर अनुषंगिक कामकाज नवीन बिटको रुग्णालयात लवकरात लवकर सुरू करून रुग्णांसाठी शासकीय दरात एम.आर.आय. व सी.टी. स्कॅनची सेवा उपलब्ध करून देण्याचा सूचना महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी अधिकार्‍यांना केल्या. आयुक्त पवार यांनी मंगळवारी (दि. 5) नाशिकरोड येथील जुने व नवीन बिटको रुग्णालयाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी नेत्ररोग विभाग, शस्त्रक्रिया विभाग, स्त्री चिकित्सा विभाग, मॉलिक्युलर लॅब, रेडिओलॉजी विभाग या विभागांची पाहणी केली. तसेच नवीन रुग्णालयात ओपीडी सुरू करण्याच्या दृष्टीने माहिती घेतली. सध्या या इमारतीत सुरू असलेल्या कामांना गती देऊन त्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. या ठिकाणी असलेले पिण्याचे पाण्याचे कूलर्स, विद्युत व्यवस्था कार्यान्वित आहे की नाही, याची खात्री त्यांनी केली. तसेच अग्निशमन व्यवस्था आदींची माहिती घेतली. तसेच स्वच्छता, देखभाल, सुरक्षा आदींसह रुग्णालयासाठी आवश्यक बाबींसाठी आराखडा तयार करून तो सादर करण्याचे निर्देश आरोग्य व बांधकाम विभागाला दिले.

यावेळी शहर अभियंता नितीन वंजारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, डॉ. आवेश पलोड, उपअभियंता नीलेश साळी आदी उपस्थित होते.

मॉड्युलर हबची पाहणी
सिन्नर फाटा येथे मल्टी मॉड्युलर हब उभारण्यात येत आहे. या ठिकाणी रेल्वेची, सेमी हायस्पीड नाशिक पुणा, नियो मेट्रो व सिटीलिंक यासाठी या ट्रान्स्पोर्टसाठी टर्मिनस तयार करण्यात येणार आहे. या जागेची पाहणी आयुक्त पवार यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button