पालघर : सव्वा सात लाखांची मागणी केल्याप्रकरणी कृषी अधिकार्‍यासह तिघांवर गुन्हे दाखल

bribery
bribery

पालघर : पुढारी वृत्तसेवा

पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत असणार्‍या वाडा तालुक्यातील कृषी अधिकार्‍यांवर तब्बल सव्वा सात लाख रुपयांच्या लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी (वर्ग १) मिलिंद धर्माजी जाधव (वय-५८), कृषी सहायक राजू रामकृष्ण नवघरे (वय-३५) आणि कृषी पर्यवेक्षक अमोल सखाराम दोंदे (वय-५०) अशी लाचखोर अधिकार्‍यांची नावे आहेत. २३ मार्चपासून पडताळणी केल्यानंतर मंगळवारी (दि.५) सायंकाळी संबंधितांवर कावाई करण्यात आली. मिलिंद धर्माजी जाधव हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्यावर पुढील कोणती कारवाई करण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वाडा तालुक्यातील मौजे रायतळे येथील आदर्श गाव योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तपासणी करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सादर केला. यानंतर आरोपी राजू नवघरे आणि अमोल दोंदे यांनी तक्रारदार यांच्या प्रलंबित कामाची तपासणी केली. त्यांनी पुढील कार्यवाहीकरिता उपविभागीय कृषी अधिकारी वाडा यांच्याकडे हे काम सादर करण्याकरिता लाचेची मागणी केली होती. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा एकूण १ कोटी ४४ लाख रुपये असून, या रकमेच्या ४ टक्के प्रमाणे ५ लाख ७६ हजार रुपयांच्या रकमेची मागणी करण्यात आली. तसेच लोकसेवक तथा उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद धर्माजी जाधव यांनी तक्रारदार यांचे प्रलंबित काम प्रमाणित करून देण्यासाठी प्रकल्प अहवालाच्या १ टक्के प्रमाणे १ लाख ५० हजार रुपये अशी एकूण ७ लाख २६ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्‍न झाले.

याप्रकरणी जाधव, नवघरे आणि दोंदे यांच्या विरुद‍्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधिकारी कृषी सचिव संचालक आणि विभागीय कृषी सहा. संचालक कोकण विभाग ४ आलोसे यांच्या समक्ष ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोनावणे, घोलप, जाधव, कडव, देसाई आणि महाले यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्यातील कृषी विभागात यापूर्वीही अनेक वेळा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. अनेक योजना कागदावरच रंगविल्या गेल्या असून प्रत्यक्षात काम नसल्याचा अनुभव पालघरवासीयांमध्ये असून विकासकामांवर प्रत्यक्ष भेट देण्यास अधिकारीवर्ग टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे कनिष्ठ अधिकार्‍यांच्या अहवालावर वरिष्ठ अधिकारी समाधान मानून कामांची खातरजमा केली गेली नसल्याने लाचखोरी वाढल्याचे बोलले जात आहे. अनेक कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला असून प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही नसल्याने कृषी विभाग भ्रष्टाचाराचे कुरणच बनले आहे.

नागरिकांना आवाहन

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास अँटी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर (02525-297297) तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्याशी खास गप्पा | पुढारी

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news