शिराळ्यात राजकीय समीकरणे बदलली : जुना नाईक गट पुन्हा एकत्र | पुढारी

शिराळ्यात राजकीय समीकरणे बदलली : जुना नाईक गट पुन्हा एकत्र

शिराळा : विठ्ठल नलवडे
माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाला खिंडार पडले आहे. भाजपाचा एक बुरूज ढासळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिराळा विधानसभा मतदारसंघात मात्र भक्कम झाली आहे. शिराळा विधानसभा संघातील राजकीय समीकरणे बदलली आहे. शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख हे भाजपात एकत्र होते. आता ते राजकीय शत्रू झाले आहेत. भाजपाकडे शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक हे नेते होते. मात्र, आता नाईक राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले आहेत. प्रामुख्याने तालुक्यात भाजपची धुरा सत्यजित देशमुख यांच्यावर राहणार आहे. तर वाळवे तालुक्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील 48 गावांची धुरा सम्राट महाडिक यांच्याकडे असणार आहे. राहुल महाडिक यांची साथ शिराळा व वाळवा तालुक्यात मिळणार आहे.

मध्यंतरी सत्यजित देशमुख व शिवाजीराव नाईक यांच्या एकीमुळे तालुक्यात भाजपाची ताकद वाढली होती. मात्र, आता ती कमी झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. शिवाजीराव नाईक यांच्या बंद असलेल्या शिवाजी केन व यशवंत ग्लुकोज या संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत होणार आहे. आमदार मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत युती केली होती, मात्र आता ते राजकीय विरोधक झाले आहेत.

मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक हे कट्टर विरोधक आता मित्र झाले आहेत. सत्यजित देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकला. भाजपात प्रवेश केला. आता आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार नाईक व शिवाजीराव नाईक एकत्र आले आहेत. सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक एकत्र आले आहेत. शिराळा तालुक्यात भाजपाचे 21 गावांचे सरपंच, 8 गावांतील आघाडीचे सरपंच, 219 ग्रामपंचायत सदस्य, वाळवा तालुक्यातील 8 गावांतील सरपंच, आघाडीचे 9, तर 137 ग्रामपंचायत सदस्य यांनी भाजपाचे राजीनामे दिले. तसेच 334 बूथ सदस्यांनी, 84 शक्‍ती केंद्र, 14 आघाड्या, 13 सेल, 2100 पदाधिकारी यांनी तसेच शिराळा नगरपंचायतीच्या काही सदस्यांनी व तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Back to top button