नाशिक : महसूलमंत्र्यांची माफी मागतो, पण पत्रावर मी ठाम – पोलिस आयुक्त | पुढारी

नाशिक : महसूलमंत्र्यांची माफी मागतो, पण पत्रावर मी ठाम - पोलिस आयुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महसूल विभागातील अधिकारी ‘आरडीएक्स’, तर कार्यकारी दंडाधिकारी हे ‘डिटोनेटर’ आहेत. त्यांचा वापर करून भूमाफिया जिवंत बॉम्बप्रमाणे काम करत असून, सर्वसामान्य जागामालक नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे महसूल विभागाचे अधिकार काढून टाकावे, अशी मागणी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे. हे पत्र समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त पाण्डेय यांनी या पत्रावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. त्याचप्रमाणे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे मन दुखावले असल्यास, त्यांची बिनशर्त माफी मागत असल्याचेही पाण्डेय यांनी सांगितले.

महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांना हाताशी पकडून भूमाफिया शहरातील जागा बळकावत असल्याचे अनेक प्रकरणे समोर येत आहेेत. आनंदवली परिसरात भूमाफियांनी मिळून जागामालकाचा खून केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर याचे गांभीर्य समोर आले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून महसूल विभागातील त्रुटी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांनी महसूलचे अधिकार काढून टाकण्याचे व संपूर्ण नाशिक जिल्हा शहर पोलिस आयुक्तालयात सामावून घेण्याचा प्रस्तावही सादर केला. हे पत्र समोर येताच अनेक चर्चांना उधाण आले. त्यावर ना. थोरात यांनी सांगितले की, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी लिहिलेले पत्र आक्षेपार्ह भाषेत आहे. या पत्राची दखल घ्यावी की नाही, असे वाटते. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. मुख्यमंत्र्यांकडे पोलिस आयुक्तांबाबतची नाराजी व्यक्त करणार असल्याचे ना. थोरात यांनी स्पष्ट केले.

यावर प्रतिक्रिया देताना पाण्डेय म्हणाले, मी अभ्यासपूर्वक पत्र पाठवले असून, काही चुकीचे केलेले नाही. लोकहितार्थ पत्र पाठवले आहे. त्यावर उचित निर्णय होईल, असे वाटते. राज्याच्या प्रगतीत महसूलचा वाटा आहे. मात्र, बि—टिशकालीन कायदे बदलण्याची गरज आहे. कोणाचेही मन दुखावण्याचा माझा हेतू नाही, तरीही महसूल विभागातील कुणाचे मन दुखावले असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, मी माझ्या पत्रावर ठाम आहे. तसेच मी काही चुकीचे केले नाही, असेही पाण्डेय यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button