पाटण : रेडॉन जिओ स्टेशनची उभारणी | पुढारी

पाटण : रेडॉन जिओ स्टेशनची उभारणी

पाटण ; पुढारी वृत्तसेवा : कोयना शिक्षण संस्थेचे बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण याठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत रेडॉन जिओ स्टेशन उभारले असून, याच्या माध्यमातून पाटण तालुका परिसरातील भूकंपसदृश हालचालीवर लक्ष ठेवणे आता सोपे होणार आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई यांच्या मार्फत इंडियन नेटवर्क फॉर डिटेक्शन ऑफ रेडॉन अ‍ॅनोम्ली हा प्रकल्प सुरू केला आहे. त्यासाठी स्वतंत्र, सौर उर्जेवर चालणारे रेडॉन जिओ स्टेशन विकसित केले आहे. या प्रकल्पा अंतर्गत रेडॉन जिओ स्टेशन देशाच्या वेगवेगळ्या भागात उभारण्यात येत आहे. रेडॉन जिओ स्टेशनची उभारणी पासून ते देखभाली पर्यंतचा सर्व खर्च भाभा अणु संशोधन केंद्राकडून करण्यात येणार आहे. बाळासाहेब देसाई कॉलेजच्या परिसरात या स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे.

स्टेशन सौरऊर्जा व डेटा कम्युनिकेशनद्वारे चालवले जाणारे स्वतंत्र युनिट आहे. यामध्ये बी.एस.एन.एल. सिमचा वापर केला असून साधारणपणे 100 किलो वजनाचे हे स्टेशन दोन मीटर जागेत स्थापित केले आहे. पाटण तालुका परिसरातील भूकंपसदृश हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने रेडॉन जिओ स्टेशन महत्त्वपूर्ण ठरेल. या स्टेशनचा भविष्यात मोठा फायदा होणार आहे, अशी माहिती रेडॉन जिओ स्टेशनचे बाळासाहेब देसाई कॉलेजमधील समन्वयक प्रा. संदीप तडाखे यांनी दिली. डॉ. महेंद्र गायकवाड यांनी जिओ स्टेशन विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी एन.एस.एस. प्रकल्पधिकारी डॉ.जी.एस.पट्टेबाहदूर, अधीक्षक विजय काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रेडॉन जिओ स्टेशनची उभारणी हे कॉलेजच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाच्या मदतीने उभारलेल्या या रेडॉन जिओ स्टेशनमुळे पाटण परिसरातील भूकंप सदृश हालचालींचा अभ्यास करता येईल.
— डॉ. एस. डी. पवार (प्राचार्य बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण)

Back to top button