आयात-निर्यात 1 ट्रिलियन डॉलर्सवर | पुढारी

आयात-निर्यात 1 ट्रिलियन डॉलर्सवर

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : कृषी-औद्योगिक उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ आणि केंद्र शासनाच्या ‘मेकइन इंडिया’ प्रकल्पाला भक्‍कम प्रतिसाद यामुळे नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (2021-22) भारतीय निर्यातीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्क्यांची वाढ नोंदवित भारतीय निर्यातीने 417.8 बिलियन डॉलर्स (3 लाख 14 हजार कोटी) हा आजवरचा उच्चांक प्रस्थापित केला असून भारतीय व्यापाराने प्रथमच 1 लाख कोटी डॉलर्सचा (1 ट्रिलियन डॉलर्स) टप्पा पार केला.

भारत सरकारने गतवर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये निर्यातीचे उद्दिष्ट निर्धारित केले होते. हे उद्दिष्ट ओलांडत गत आर्थिक वर्षात म्हणजेच 31 मार्चअखेर 417.8 बिलियन डॉलर्सची निर्यात झाल्याचे वाणिज्य मंत्रालयाने अधिकृतरीत्या जाहीर केले आहे. देशातील निर्यातीचा हा विक्रम आहेच. शिवाय, शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टापेक्षा 5 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आहे. याखेरीज केवळ मार्च 2022 मध्ये एका महिन्यात 40.38 बिलियन डॉलर्स एवढ्या किमतीच्या वस्तू भारतातून निर्यात झाल्या.

भारतामधून निर्यात झालेल्या वस्तूंमध्ये पेट्रोलजन्य पदार्थ, जवाहिरे आणि दागदागिने, औद्योगिक उत्पादने, कृषी उत्पादने व औषधांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही निर्यात नेदरलँड, बेल्जियम, संयुक्‍त अरब अमिरात, बांगलादेश, अमेरिका, युरोप, सिंगापूर, जर्मनी आणि हाँगकाँग यासह जगातील विविध देशांमध्ये झाली. नेदरलँड व बेल्जियममध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 90 टक्क्यांची वाढ मिळाली, तर संयुक्‍त अरब अमिरात आणि बांगलादेशातील गतवर्षीच्या तुलनेत निर्यातवाढीचे प्रमाण अनुक्रमे 66.90 व 64.50 टक्के आहे.

अमेरिकेला निर्यात झालेल्या वस्तूंची वाढ 28 टक्क्यांवर आहे. एकूण निर्यातीमध्ये सर्वाधिक 111 बिलियन डॉलर्सची निर्यात औद्योगिक उत्पादनांची आहे.

आयातीतही 51 टक्के वाढ

गत आर्थिक वर्षात आयातीतही तब्बल 51 टक्क्यांची वाढ झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 589 बिलियन डॉलर्स एवढ्या किमतीच्या वस्तू देशामध्ये आयात करण्यात आल्या. यामुळे आयात आणि निर्यातीतील एकूण तूट 189 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे.

Back to top button