गोरखनाथ पीठ मंदिरावरील हल्ल्याचे नवी मुंबई कनेक्शन

गोरखनाथ पीठ मंदिरावरील हल्ल्याचे नवी मुंबई कनेक्शन
Published on
Updated on

गोरखपूर/नवी मुंबई ; वृत्तसंस्था : गोरखनाथ पीठ मंदिरात झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या प्रयत्नात मुंबई आयआयटीत शिकलेला आणि पूर्वी नवी मुंबईत वास्तव्यास असलेला रसायन अभियंता मुर्तझा मुनीर अब्बासी पकडला गेला.

मुर्तझा मंदिरात शिरत असतानाच त्याला पीएसी जवानांनी रोखले. त्याने मोठ्या रुमालात लपविलेले धारदार शस्त्र काढून जवानांवर हल्ला केला. त्यात दोन जवान जखमी झाले.

हा हल्ला एका मोठ्या दहशतवादी कटाचा भाग असू शकतो. यातूनच एटीएसने या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. गोविंद नावाच्या जवानाला वाचविण्यासाठी दुसरा जवान अनिल जसा पुढे सरसावला, तसे अब्बासीने त्याच्या हातावर व पोटावर वार केले. जवान अनुराग राजपूत रायफलसह धावून येताच मुर्तझा पळायला लागला. गेटवरील कर्मचार्‍यांनी त्याला धरले.

नवी मुंबई कनेक्शन

मुर्तझा मूळचा गोरखपूरचाच असला तरी त्याच्याकडील आधारकार्डवर नवी मुंबईच्या सानपाड्यातील सिडकोची महागडी वस्ती असलेल्या मिलेनियम टॉवर्सचा पत्ता आढळला. त्यामुळे या हल्ल्याशी थेट नवी मुंबईचे कनेक्शन जोडले गेले. मुर्तझा व्यवसायाने रसायन अभियंता असून, अब्बासी नर्सिंग होममध्ये मुर्तझाच्या कुटुंबीयांची चौकशीही सुरू आहे.

मुंबईहून आल्यानंतर हल्ला

सध्या तो नवी मुंबईत राहात नसला तरी हा हल्‍ला करण्यापूर्वी तो मुंबईत होता. मुंबईहूनच तो गोरखपूरला आला. त्याच्याकडे इंडिगो एअरलाइन्सचे तिकीटही मिळाले आहे. तो गोरखपुरातील कार्मल शाळेजवळ राहातो. मुंबई आयआयटीमधून मुर्तझाने केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. मुंबईमध्ये रसायन अभियंता म्हणून तो नोकरी करत होता. गतवर्षी कोरोनात त्याची नोकरी सुटली. बायकोही त्याला सोडून गेली होती. मला मरायचेच आहे. कुणीतरी मला गोळी घालावी म्हणून मी हा हल्ला केला, असे हल्लेखोर मुर्तझाचे म्हणणे आहे.

गोरखपूर आणि गोरखनाथ मंदिर मुख्यमंत्र्यांशी संबंधित पवित्र स्थळे असल्याने ती दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या कार्यकाळात एकही धार्मिक दंगा झालेला नाही, हे आवर्जून सांगतात. त्यांचे हे म्हणणे खोटे ठरवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा हेतू एखाद्या दहशतवादी संघटनेचा असू शकतो. या अंगानेही तपास केला जात आहे. योगींच्या शपथविधीच्या दिवशीही गोरखपुरातील चौरीचौरा येथे दंगल घडविण्याचा कट उघडकीला आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news