धुळे : पुण्याच्या व्यापाऱ्यांची ४० लाखांची रोकड लुटणारी टोळी गजाआड | पुढारी

धुळे : पुण्याच्या व्यापाऱ्यांची ४० लाखांची रोकड लुटणारी टोळी गजाआड

धुळे; पुढारी वृत्तसेवा : तांब्याची वायर खरेदी करण्याचे आमिष दाखवून पुण्याच्या व्यापाऱ्याकडून ४० लाखांची लूट करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी गजाआड केले आहे. या टोळीकडून पाच लाख ४७ हजाराची रोकड आणि ५ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

पुणे येथे राहणारे दसवेल सुखविंदर कालरा यांना ऑनलाईन साइटवर तांब्याची केबल विक्रीला असल्याची माहिती मिळाली. या साईटवर सागर पाटील, महेश पाटील आणि राजेंद्र पाटील तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानुसार दसवेल कालरा यांनी संपर्क केल्यानंतर त्यांना छडवेल शिवारातील सुजलॉन कंपनीच्या पाठीमागे ही तांब्याची वायर घेण्यासाठी पैशांसह बोलाविले. त्यानुसार दसवेल कालरा हे धुळ्यात आल्यानंतर त्यांनी याना संपर्क केला. मात्र, त्यांना कॉपरची वायर देण्याऐवजी मारहाण करून त्यांच्याकडील ४० लाखांची रोकड हिसकावून घेण्यात आली. यासंदर्भात त्यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात भादवि कलम ३९५, ५०४, ५०६सह भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याची पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी गंभीर दखल घेतली. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवत यांना सोपविण्यात आला. त्यानुसार या पथकाने घटनेचा तपास सुरू केला. तपासात हा गुन्हा नवरत पवार तसेच सागर पाटील असे बनावट नाव वापरून फेसबुक अकाउंट तयार करून त्या माध्यमातून केल्याची बाब समोर आली. या अकाउंटवर तांब्याच्या वायरचे फोटो टाकून त्यावर संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानुसार ग्राहकांनी या संपर्क क्रमांकावर फोन केल्यानंतर ते फसवणूक करत असल्याचे आणि त्यांची बनावट नावांचा वापर केल्याचे निदर्शनास आले. यात त्यांनी इक्बाल चव्हाण याने राजेंद्र पाटील हे बनावट नाव तर कृष्ण भोसले याने महेश पाटील असे बनावट नाव वापरून कालरा यांना संपर्क केल्याची बाब तपासात पुढे आली.

पोलीस निरीक्षक बुधवंत यांनी मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी गुजरात राज्यातील बारडोली येथील मेळामधून जिजे १९ एम ४५०६ क्रमांकाची कार खरेदी करून राजस्थानला पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वेगवेगळे दोन पथक तयार करून त्यांच्या मोबाईलचे लोकेशन घेणे आरोपींचा शोध पोलिस पथक घेत होते. यानंतर हे आरोपी कारने चोपडा शहराकडून शिरपूरकडे येत असल्याचे समजल्याने पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्यासह उपनिरीक्षक सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राऊत आणि पथकाने सापळा रचला. त्यानुसार ही गाडी ताब्यात घेण्यात आली.

यात तीन व्यक्ती मिळून आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानुसार त्यांची नावे एकबाल चव्हाण, कृष्णा भोसले आणि नूर आलम मोहम्मद सय्यद असल्याचे निदर्शनास आले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून पाच लाख ४७ हजाराची रोकड आणि पाच मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला. या टोळक्याने जप्त केलेल्या मोबाईलमध्ये कॉपर केबल, मांडूळ आणि पैसे आणि फसवणुकीसाठी वापरले जाणारे इतर व्हिडिओ आणि फोटो मिळून आले. त्यामुळे या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे अन्य जिल्हे आणि राज्यात केला आहे का? याचा तपास सुरू आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button