सांगली: पर्यटन विकासासाठी 15 कोटी | पुढारी

सांगली: पर्यटन विकासासाठी 15 कोटी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत पलूस तालुक्यातील सहा पर्यटन केंद्रासाठी 15 कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. यापैकी साडेचार कोटीचा निधी वितरीत करण्यात आला असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

ना. कदम म्हणाले, ब्रह्मनाळ, कुंडल, बुर्ली, बुरुंगवाडी, पुणदी, सांडगेवाडी या गावांचा यामध्ये समावेश आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत सन 2021-2022 वर्षांसाठी हा निधी देण्यात आला आहे.

ब्रम्हनाळ येथील आनंदमूर्ती मठ परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्त निवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 4 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 1 कोटी 20 लाख इतका निधी वितरीत केला आहे. बुर्ली येथील बंचाप्पा मंदिर परिसरात रस्ता, उद्यान, कृष्णा घाट, भक्तनिवास इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 3 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 90 लाख इतका निधी वितरीत केला आहे.

बुरुंगवाडी येथील ब्रम्हानंद महाराज मठ परिसरात रस्ता, भक्तनिवास, सभागृह, पार्किंग सुविधा पुरविण्यासाठी 2 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 60 लाख इतका निधी वितरीत केला आहे.

कुंडल येथील दत्त मंदिर परिसरात रस्ता व इतर सोई-सुविधा पुरविण्यासाठी 1 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 30 लाख इतका निधी वितरीत केला आहे. पुणदी येथील लक्ष्मी मंदिर परिसरात भक्तनिवास, सभापंडप, रस्ता काँक्रीटीकरण, नदी घाट बांधकाम करण्यासाठी 2 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून यापैकी 60 लाख इतका निधी वितरीत केला आहे.

सांडगेवाडी लक्ष्मी मंदिर परिसरात भक्तनिवास, सभागृह, जोडरस्ता, संरक्षण भिंत, पार्किंग, जमीन सुधारणा करण्यासाठी 3 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून 90 लाख इतका निधी वितरीत केला आहे.

Back to top button