पहिले विश्‍वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापुरात सोमवारपासून! | पुढारी

पहिले विश्‍वात्मक संत साहित्य संमेलन कोल्हापुरात सोमवारपासून!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापुरात पहिले विश्‍वात्मक संत साहित्य संमेलन सोमवार दि. 4 ते 6 एप्रिल या कालावधीत होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी होणार आहे. यावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे.

पहिल्या दिवशी आदमापूर (ता. भुदरगड) येथे संत श्री बाळूमामा समाधीचे दर्शन आणि पूजाअर्चा भारत सरकारच्या कंपनी लवादाचे सदस्य, ज्येष्ठ कीर्तनकार व संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता होणार आहे. मंगळवारी (दि. 5) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी 11 वा. संमेलनाचे उद्घाटन तर दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते ग्रंथ दालनाचे सकाळी 10 वा. उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे तर पालकमंत्री सतेज पाटील प्रमुख पाहुणे आहेत.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची उपस्थिती असेल. अमरवाणी इव्हेंट आयोजित पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र व उदयपूर संस्कृती मंत्रालय भारत सरकार व इंडस्मून प्रा.लि. मुंबई यांच्यातर्फे हे संमेलन होईल, अशी माहिती संमेलनाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी येथे शुक्रवारी दिली. यानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघात ह.भ.प. मदन महाराज गोसावी यांंचा वार्तालाप झाला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे उपस्थित होते.

डॉ. प्रकाश खांडगे यांनी संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, आदमापूर येथे सोमवारी होणार्‍या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. रामचंद्र देखणे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.मंगळवारी पहाटे 6 वा. आराध्य दैवत श्री महालक्ष्मीचे पूजन ह.भ.प. रंगनाथ नाईकडे, आनंदराज गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. दिवसभरात चित्रप्रदर्शन उदघाटन, ग्रंथ स्मरणिकेचे प्रकाशन, संमेलनाध्यक्षांचे बीजभाषण होणार आहे. यानंतर दुपारी मारुती महाराज कुरेकर यांना संत शिरोमणी पुरस्कार तसेच विश्‍वात्मक संत साहित्य संमेलनतर्फे हरिद्वारचे महंत ऋषीश्‍वरानंदजी यांना विश्‍वात्मक संत जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

विदेशी अभ्यासक शोधनिबंध वाचन, भक्‍तिसंप्रदाय आणि विश्‍वात्मकता, भक्‍ती – वसा की व्यवसाय या विषयावर चर्चा होणार आहे. सायंकाळनंतर भक्‍ती संगीत महोत्सव होणार आहे. याचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.बुधवारी (दि. 6) संमेलन समारोपास माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री जिश्‍नूदेव वर्मा, काशी सुमेरू पीठ वाराणसीचे जगद‍्गुरू शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंद सरस्वती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के उपस्थित राहणार आहेत. समारोप सायंकाळी 4 वाजता होणार आहे.

Back to top button