नाशिक : नऊ वर्षांनी फिरणार ‘नासाका’ची चाके | पुढारी

नाशिक : नऊ वर्षांनी फिरणार ‘नासाका’ची चाके

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
कर्जबाजारीपणामुळे नऊ वर्षांपासून बंद नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. निविदा प्रक्रिया कायदेशीरपणे पूर्ण केल्यानंतर जिल्हा बँक प्रशासन आणि दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांच्यात 25 वर्षांचा करारनामा झाला. यामुळे साखर कारखाना सुरू करण्याचा मार्ग पूर्णतः मोकळा झाला आ. हेयेत्या काही दिवसांत साखर कारखान्याची चाके फिरणार असून, मशीनरी पुन्हा धडाडणार आहेत. नाशिक, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर येथील ऊस उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नासाकाचे कार्यक्षेत्र नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर हे चार तालुके असून, सभासदांची संख्या सुमारे 17 हजार आहे. त्यामुळे कारखान्याला वैभवाची मोठी झळाळी होती. नंतर मात्र अधोगती सुरू झाली. नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या 84 कोटींच्या कर्जाची परतफेड न झाल्याने कर्जाची रक्कम 105 कोटींच्या घरात गेली. परिणामी, बँकेने टाळे ठोकत कारखाना जप्त केला होता. यामुळे हजारो कामगार देशोधडीला लागून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मोठी कुचंबणा झाली होती. शेतकर्‍यांच्या विविध संघटनांनी आणि पदाधिकार्‍यांनी खा. गोडसे यांना गळ घातली होती. शेतकर्‍यांच्या हिताचा प्रश्न असल्याने खा. गोडसे यांनी दोन वर्षांत अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खा. शरद पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासन यांच्या भेटी घेत पाठपुरावा केला. विद्यमान आमदार सरोज अहिरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप यांचेही यात सहकार्य लाभले.

नासाका बंद असल्याने जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मोठी कुचंबणा व आर्थिक नुकसानही होत होते. ऊस उत्पादकांचे हित लक्षात घेऊन साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले असून, येत्या काही दिवसांतच साखर कारखाना पुन्हा नव्या उमेदीने सुरू होणार आहे. – खा. हेमंत गोडसे

दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सची केली निवड
दरम्यानच्या काळात कारखाना सुरू करण्यासाठीच्या सुमारे आठ वेळा निविदा काढण्यात आल्या. तीन वेळेस तर कारखाना विक्रीसाठीच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यास कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर खा. गोडसे यांनी पुढाकार घेत सहकार्‍यांच्या मदतीने निविदा सादर केल्या. यावेळी बँकेचे प्रशासक अरुण कदम यांनी या प्रकरणाचा अभ्यास करत शासन व साखर आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निविदा प्रक्रिया राबविली.

यामध्ये नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, बी. टी. कडलग कन्स्ट्रक्शन, मेसर्स बी. पी. सांगळे कन्स्ट्रक्शन, विपुल पालान या चार कंपन्यांच्या निविदा तांत्रिक मुद्द्यावर पात्र ठरल्या. त्यानंतर दीपक चंदे यांची दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीची निवड करत जिल्हा बँक व्यवस्थापनाने या कंपनीस करार करण्याबाबतचे अधिकृत पत्र दिले. नाशिकरोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जिल्हा बँक आणि दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स यांच्यात 25 वर्षांसाठी करारनामा झाला.

हेही वाचा :

Back to top button