‘स्पेस एक्स’ बनवणार अद्ययावत यान | पुढारी

‘स्पेस एक्स’ बनवणार अद्ययावत यान

वॉशिंग्टन ः एलन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीने आता नव्या पिढीचे, अद्ययावत अंतराळयान बनवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे ‘ड्रॅगन क्रू कॅप्सूल’चे उत्पादन कंपनीने थांबवले आहे. दुसरीकडे जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ने अंतराळातील चौथ्या प्रवासाची तयारी केली आहे.

‘स्पेस एक्स’च्या एका अधिकार्‍याने सांगितले की कंपनीने आपली सर्व सामग्री आता नव्या पिढीच्या अंतराळ कार्यक्रमांच्या विकासासाठी लावली आहे. आता कंपनी एक मोठे व अद्ययावत असे अंतराळयान बनवणार आहे. नव्या योजनेत ‘स्टारशिप’, ‘स्पेस एक्स मून’ आणि ‘स्पेस एक्स मार्स’ रॉकेट बनवले जाईल. इंजिनच्या विकासात येत असलेल्या अडचणी तसेच नियामक समीक्षांमुळे ‘स्टारशिप’ लाँच करण्यात विलंब होत आहे.

सध्याच्या अंतराळयानात केवळ चार अंतराळवीरच बसू शकतात. त्यामुळे कंपनीने नवे व मोठे अंतराळयान बनवण्याची तयारी केली आहे. ‘स्पेस एक्स’च्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलने 2020 नंतर सरकारी आणि खासगी अंतराळवीरांच्या पाच दलांना अंतराळात नेले आहे. प्रत्येक उड्डाणानंतर कॅप्सूलचे फ्लोरिडातील स्पेस एक्स सेंटरमध्ये नूतनीकरण केले जाते.

या सेंटरला कंपनी ‘ड्रॅगनलँड’ असे संबोधते! दुसरीकडे ‘अ‍ॅमेझॉन’चे जेफ बेजोस यांची कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ आपल्या चौथ्या अ‍ॅस्ट्रो-टुरिजम अंतराळ प्रवासाच्या तयारीत आहे. यावेळी अंतराळ प्रवासाबाबत कोणतेही बडे नाव समोर आलेले नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button