कराड : शंभूराज, तुमचा रिप्लाय ऐकला… खूप छान | पुढारी

कराड : शंभूराज, तुमचा रिप्लाय ऐकला... खूप छान

कराड; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे गृह, वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला तसेच विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या मुद्दयांना मुद्देसुद उत्तर देत सरकारची व वित्त विभागाची बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना. देसाई यांच्या कामांचे व उत्तराचे कौतुक केले आहे.

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकाच वेळी विधानसभा व विधानपरिषद सभागृहात अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेचे उत्तर आल्याने विधानसभा सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर विधानपरिषद सभागृहात वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेला उत्तरे दिली. विधानसभा सभागृहाचे कामकाज पहात वित्त मंत्री अजित पवार हे विधानसभा सभागृहातून संगणकावर शंभूराज देसाई यांचे विधानपरिषदेतील अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेचा रिप्लाय ऐकत होते.

विधानपरिषदेचे कामकाज संपवून विधानसभेत आलेल्या शंभूराज देसाई यांना पाहिल्यानंतर ना. अजित पवार यांनी जवळ बोलवून घेतले आणि शंभूराज, अर्थसंकल्पावरील तुमचा रिप्लाय ऐकला. रिप्लाय जोरदार, खूप छान, मुद्देसुद झाला शासनाची भूमिका व वित्त विभागाची बाजू तुम्ही भक्कमपणे मांडली. खूप छान असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ना. शंभूराज देसाई यांच्या उत्तराचे कौतुक केले.

या अधिवेशनात विधानपरिषद सभागृहात गृह आणि वित्त विभागाचे बहुतांशी कामकाज हे राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीच पाहिले. त्यांच्याकडे असणार्‍या गृह, वित्त विभागाची बाजू तसेच शासनाची भूमिका त्यांनी विधानपरिषद सभागृहात योग्य प्रकारे आणि भक्कमपणे मांडली. तसेच विरोधी पक्षाला सडेतोड उत्तरे देत ना. शंभूराज देसाईंनी विरोधकांच्या सगळया प्रश्नांचे निरसन केले. तसेच आपल्या कार्यशैलीतून ते सत्ताधार्‍यांसह विरोधकांचेही लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वीही उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी ना. शंभूराज देसाई यांच्या कार्याचे कौतुक केले होते.

आमचे शंभूराज, सक्षम आहेत : ना. अजित पवार

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये एका महत्त्वाच्या बैठकीवेळी आमचे शंभूराज, सक्षम आणि भक्कम आहेत. त्यांचेवर जबाबदारी द्या. ते ती पार पाडतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत ना. शंभूराज देसाईंच्या कामकाजाला पाठबळ दिलेे.

Back to top button