नाशिक : गोदाघाटाची मनपा आयुक्तांनी केली पाहणी ; दिले महत्वाचे आदेश | पुढारी

नाशिक : गोदाघाटाची मनपा आयुक्तांनी केली पाहणी ; दिले महत्वाचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामांना गती देऊन गोदाघाट आणि रामकुंड परिसराचे रूप पालटण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी पाहणी दौर्‍यादरम्यान संबंधित विभागाला देत स्मार्ट सिटीच्या कामांना होणार्‍या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत अधिकार्‍यांसह ठेकेदारांची कानउघडणी केली. दरम्यान, रामकुंड भागातील अस्ताव्यस्त असलेली छोटी दुकाने एकसारखे करण्याबाबतही नियोजन केेले जाणार आहे.

मनपा आयुक्त रमेश पवार यांनी गुरुवारी (दि.31) रामवाडी पूल ते टाळकुटेश्वर पूल या परिसराची पाहणी केली. दौर्‍यात नाशिक महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रामवाडीजवळील गोदा प्रकल्प, दहीपूल परिसरासह निलगिरी बाग येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली. पाहणीवेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, शहर अभियंता नितीन वंजारी, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, एस. एम. चव्हाणके, उदय धर्माधिकारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, कार्यकारी अभियंता अविनाश धनाईत, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी आदी उपस्थित होते.

आयुक्तांनी दिलेले आदेश असे…
रामवाडी पूल रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभीकरण करावे.
गोदापार्कसाठी उंच भिंती बांधू नये.
लेंडी नाल्यातील सांडपाणी मिश्रित होऊ नये.
रामकुंड परिसराची स्वच्छता ठेवावी.
रामुकंड व परिसरातील स्मार्ट सिटीची कामे तातडीने करावीत.

एकसारखे स्टॉल देणार
रामकुंड व परिसराची पाहणी करताना आयुक्तांच्या नजरेस अस्ताव्यस्त असलेली छोटी-छोटी दुकाने पडली. यामुळे एकतर विद्रुपीकरण दिसतेच शिवाय वाहतूक कोंडीही निर्माण होत असल्याने या भागातील दुकानदारांना एकसारखे स्टॉल उपलब्ध करून दिल्यास सुशोभीकरण होईल आणि कोंडीही सुटेल. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फत आराखडा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय अधिकार्‍यांना दिले. येत्या 7 एप्रिल रोजी पुन्हा पाहणी दौरा आहे.

हेही वाचा :

Back to top button